महाराष्ट्र शासन आणि हायड्रोजन उर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले. या संदर्भात माहिती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज महाराष्ट्र राज्य हे ग्रीन हायड्रोजनमध्ये सर्वात अग्रणी राज्य ठरले आहे. विविध कंपन्यांबरोबर आज राज्य शासनाने २ लाख ७६ हजार ७०० कोटी रुपयांचे करार केले असून यातून सुमारे ६६ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. करार करण्यात आलेल्या कंपन्या या देशातील सर्वात महत्वाच्या कंपन्या आहेत. ग्रीन हायड्रोजनमधील पॉलीसी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक येत आहे.
फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारची कंपनी असणाऱ्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी बरोबर ८० हजार कोटी, अवाडा ग्रीन हायड्रोजन कंपनीबरोबर ५० हजार कोटी, रिन्यू इ फ्युएअल्स कंपनीबरोबर ६६ हजार कोटी, आयनॉक्स एयर प्रोडकट्स कंपनीबरोबर २५ हजार कोटी, एलनटी ग्रीन टेक कंपनीबरोबर १० हजार कोटी, जेएसडब्लू ग्रीन हायड्रोजन कंपनीबरोबर १५ हजार कोटी अशा सुमारे २ लाख ७६ हजार ७०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
ते म्हणाले याशिवाय आणखी एक महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला त्यात जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी असणाऱ्या आर सेलर मित्तल निपॉन स्टील या कंपनीसोबत ६ मिलियन टन स्टील प्लांटचा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून सुमारे ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक स्टील क्षेत्रात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.