आई हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी!
आईने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, काय आणलंयस बाबा?
अगं बघ तर…
त्याने दोन खोके आईसमोर ठेवले.
आई म्हणाली, अरे कसले खोके आहेत? काय आहे रे त्यात?
अगं उघडून तर बघ मग कळेल.
आईने एक खोका उघडला आणि तिने डोळे विस्फारले…
म्हणाली, केवढे रे हे पैसे? कशासाठी आणले आहेस हे?
चिरंजीव म्हणाला, अगं हे तुझ्यासाठी आहेत. दोन कोटी आहेत दोन कोटी.
चिरजीवांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता.
आई म्हणाली, माझ्यासाठी एवढे पैसे? मी काय करू त्याचं. आणि या दुसऱ्या खोक्यात काय आहे?
मुलगा म्हणाला, बघ बघ उघडून. तुझा मुलगा काय करतो हे कळेल तरी!
आईने दुसरा खोका उघडला आणि ती म्हणाली अरे हे घड्याळ कशाला आणले आहेस? ते कुणासाठी आहे?
मुलगा म्हणाला, अगं तुझ्यासाठी.
आई म्हणाली, अरे मी काय करणार या घड्याळाचं?
तर तो म्हणाला, अगं आपली वेळ बदलली आता. गेले ते दिवस. माझा ‘टाइम’ आला आता!
आई उद्गारली..खरंच रे पोरा, कौतुक वाटतं तुझं. केवढं कमावलंस. उभ्या जन्मात कधी एवढे पैसे बघितले नसते मी. शाब्बास. मला अभिमान वाटतो तुझा.
तेवढ्यात…
मुलगा किंचाळत उठला. त्याचा कान रक्ताळला होता. डोळे उघडून त्याने बघितले तर आईने त्याचा कान कडकडून चावला होता.
मुलगा चिडला. काय करतेस आई? का चावलास कान माझा?
आई म्हणाली, रात्री तू आणलेस ना हे खोके? ते ठेवून तू झोपी गेलास. पण मी उघडून बघितले आणि भोवळच आली मला. तुझा पगार किती, तू कमावतोस किती? कुठून आणले असतील एवढे पैसे असा मनात विचार आला. वाटलं, कसले पैसे असतील, चोरीचे तर नसतील ना आणि उद्या त्यासाठी कोर्टाने तुला शिक्षा दिली तर त्याच कोर्टात माझा कान चावून तू मला विचारशील…आई आधीच जर तू मला थांबवलं असतंस तर मला आज तुरुंगात जायची वेळ आली नसती. म्हणून मीच तुझा कान चावून तुझे डोळे उघडले. नको तुझे हे पैसे आपल्या घरात! फेकून दे ते खोके घराबाहेर.
(सत्यकथेवर आधारित)
– महेश विचारे