शिवसेना कुणाची यावरून गेले काही महिने संघर्ष सुरू असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाकडून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज जमा करण्यात आले होते. मात्र निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे हे अर्ज नसल्याने उद्धव ठाकरे गटाचे तब्बल अडीच लाख अर्ज बाद झाले आहेत.
दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला दोन ट्रक भरून अर्ज पाठविण्यात आल्याचे वृत्त होते. शिवसेना ही आमचीच आहे, असा दावा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटांकडून करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अकरा लाख अर्ज आयोगाकडे पाठविण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हे अर्ज दोन ट्रकमध्ये भरून ते दिल्लीकडे रवाना करण्यात आले होते. एकूण राज्यभरातून ठाकरे गटाने हे अर्ज गोळा केले आहेत. हे अर्ज बूथ प्रमुख, पदाधिकारी, जिल्हाप्रमुख अशा सगळ्यांचे आहेत.
हे ही वाचा:
जानेवारी २०२४ला अयोध्येत आनंदीआनंद; प्रभू श्रीरामाचे करता येणार दर्शन
पहाटे झालेल्या हल्ल्यात बिबट्याने घेतला चिमुरडीचा बळी
बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले
अंधेरीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण गोठवले आहे. त्यासंदर्भात आता निवडणूक आयोगाकडे लढाई सुरू आहे.
जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ही शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तोच दावा उद्धव ठाकरे यांच्याकडूनही करण्यात आला. मुंबईतील अंधेरी येथील पोटनिवडणुकीआधी दोन्ही गटांना स्वतंत्र नावे देण्यात आली. त्यानुसार उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आणि त्यांना मशाल चिन्ह दिले गेले तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आणि त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले.