स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका

केंद्रीय गृह सचिवाची माहिती

स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची कारागृहातून होणार सुटका

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येणार आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी १८६ कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय गृह सचिवाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

केंद्रीय गृह सचिवाकडून माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी ९ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्याच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे.

माफी योजनेचा उद्देश हा कैद्यांमध्ये कारागृहातील शिस्त आणि आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळे बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे.

हे ही वाचा:

‘न्यूजक्लिक’ प्रकरणी ईडीची उच्च न्यायालयात धाव

शिवसेना, राष्ट्रवादीत व्हीपचा राडा, एकमेकांना पाडा

१८ वर्षांपूर्वी अंतराळ सफरीचे तिकीट काढणाऱ्याचे स्वप्न झाले साकार!

जम्मू काश्मीरचे सार्वभौमत्व भारतात संपूर्ण विलीन

यानुसार, पहिल्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६,  दुसऱ्या टप्प्यामध्ये २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ बंद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले होते. तर, आता तिसऱ्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी १८६ बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने दिले आहेत. अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये एकूण ५८१ बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे.

Exit mobile version