अंधेरी स्टेशनला लिफ्टमध्ये १८ जणांचा श्वास कोंडला

गरोदर महिलेला झाली दुखापत; मात्र अघटित घडले नाही

अंधेरी स्टेशनला लिफ्टमध्ये १८ जणांचा श्वास कोंडला

अंधेरी रेल्वेस्थानकातील लिफ्ट बंद पडल्यामुळे त्यात अडकलेल्या लोकांचे जीव जाण्याची वेळ आली होती पण वेळीच त्या लोकांची सुटका करण्यात आली. १८ लोक या लिफ्टमध्ये अडकले होते. प्रमाणापेक्षा अधिक लोक लिफ्टमध्ये शिरल्यामुळे ही अवस्था झाली. यात एक गरोदर महिलाही होती, ती जखमी झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तिथे धाव घेतली. शिवाय, अंधेरी जीआरपी पोलिसही तिथे पोहोचले. लिफ्टमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी लिफ्टचे कुलुप तोडण्यात आले. त्यासाठी १५-२० मिनिटांचा कालावधी लागला. पण या सगळ्या धावपळीत त्या लिफ्टमध्ये अडकलेल्या गरोदर महिलेला दुखापत झाली. या महिलेला नंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ही लिफ्ट तांत्रिक कारणामुळे बंद पडल्याचे सांगण्यात आले.

प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ या मध्ये असलेल्या लिफ्टमध्ये ७.३० च्या सुमारास ही घटना घडली. रेल्वेतून उतरलेले प्रवास लिफ्टमध्ये चढले पण ती लिफ्ट अचानक बंद पडली. त्यात हे १८ लोक होते.

हे ही वाचा:

भारतीय फुटबॉल महासंघावरील बंदी उठली; मुलींचा वर्ल्डकप होणार

भारतीय सैनिकांनी रक्त देऊन वाचवले दहशतवाद्याचे प्राण

अंधेरीतील मुलीचा मृतदेह सापडला वसईत

बालवाडीची माहिती मिळणार एका क्लिकवर

 

या लिफ्टमध्ये अडकलेल्या जखमी गरोदर महिलेला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. संध्याकाळची वेळ असल्याने लिफ्टमध्ये चढणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्याचा फटका या सगळ्यांना बसला.

सध्या ही लिफ्ट पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी बॅरिकेट लावून लिफ्टमधील प्रवेश बंद केला आहे. आता लिफ्टची दुरुस्ती केल्यानंतरच ती लोकांसाठी खुली होऊ शकेल. यासंदर्भात जीआरपी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी दत्तात्रय निकम यांनी माहिती दिली.

Exit mobile version