देशभरात थंडीला सुरुवात झाली असून काही राज्यांमध्ये दाट धुके पसरत आहे. दिल्ली- एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीत आणि दाट धुक्यात हरवले आहे. दाट धुक्यामुळे अनेक भागात दृश्यमानता शून्यावर पोहोचली. उत्तर प्रदेशमध्ये तर थंडी आणि धुके जीवघेणे ठरत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या रस्ते अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी आहे. यामुळेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांचा अयोध्या दौरा रद्द करावा लागला आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्येत मोठा सोहळा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त ३० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा देखील आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री व्यवस्थेची पाहणी करणार होते. पंतप्रधान ३० डिसेंबर रोजी अयोध्येतील नवीन विमानतळ आणि नवीन रेल्वे इमारतीचे उद्घाटन करतील.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेपासून संपूर्ण राज्यात दाट धुके होते. काही भागात दृश्यमानता ४० मीटरपेक्षा कमी नोंदवली गेली. पुढील दोन दिवस सकाळी दाट धुके राहण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
माहितीनुसार, सिसैया- धौराहरा मार्गावरील बाबुरी गावाजवळ दाट धुक्यात भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकल जाणाऱ्या भाऊ आणि बहिणीचा मृत्यू झाला आहे. पोलिस उपअधीक्षक पी. पी. सिंह यांनी सांगितले की, धौरहरा कोतवाली भागातील अभयपूर गावात राहणारे पंकज कुमार (वय २२ वर्षे) आणि त्यांची बहीण सुषमा यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. रस्त्यावर दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकही रस्त्यावर पलटी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरीकडे, उन्नावमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मोटारसायकलची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात गोविंद पाठक (वय ३१ वर्षे) आणि विवेकानंद (वय २१ वर्षे) अशी अपघात झालेल्यांची नावे आहेत. असेच दाट धुक्यामुळे विविध भागात आणखी अपघात झाले.
हे ही वाचा:
काँग्रेसची थीम ‘है तय्यार हम’ असली तरी लोक मात्र तयार नाहीत!
करणी सेना प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या घरावर बुलडोजर!
दहशतवादी हाफिज सईदला आमच्या स्वाधीन करा!
अयोध्या; चौरासी (८४) कोसी परिक्रमा परिसरात ‘दारू बंदी’!
उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (UPSRTC) क्षेत्रीय व्यवस्थापक लोकेश राजपूत यांनी सांगितले की, दाट धुक्यामुळे आम्ही बस चालवण्याच्या वेळेत बदल केला आहे. अपघात टाळण्यासाठी दाट धुक्यात रात्रीच्या वेळी बससेवा बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. धुक्याचा परिणाम हवाई सेवा आणि रेल्वे सेवेवर दिसून येत आहे. धुक्यामुळे लखनौला जाणारी आणि येणारी १७ उड्डाण रद्द करावी लागली. तर काही उड्डाणे वळवण्यात आली आहेत. धुक्यामुळे रेल्वेचा वेगही कमी झाला आहे. लखनौमधून जाणाऱ्या ४० हून अधिक गाड्या काही तास उशिराने धावत आहेत.