कर्नाटकच्या बेंगळूरूमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. हुस्कुर मद्दुरम्मा मंदिराच्या जत्रेसाठी तयार केलेला १५० फुटी रथ अचानक कोसळला. या दुर्घटनेत एका भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जत्रेसाठी तयार करण्यात आलेल्या लाकडी रथाची उंची १५० फुटहून अधिक असल्याची माहिती आहे. रथ दुर्घटनेत एका २६ वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला. लोहित असे मृताचे नाव आहे. यामध्ये दोन महिलांसह तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंदिरासमोर असे एकूण चार रथांना एकत्रित आणण्यात येत होते. याच दरम्यान, एक रथ ओढत असताना हवामान बदलले आणि एक जोरदार वादळ आले. या वादळात रथाचा तोल गेला आणि रथ एका बाजूला कोसळला. रथाखाली चिरडले जाऊ नये म्हणून भाविक दूर गेले पण अनेकांना त्याचा फटका बसला.
दोड्डानगमंगला येथील रहिवासी नारायण नावाच्या एका भक्ताने सांगितले की, ‘मी माझ्या गावातील १५० फूट उंच रथाच्या थोडे पुढे होतो. मग मला ओरडण्याचा आवाज आला. मी मागे वळून पाहिले तर सजवलेला रथ खाली पडताना दिसला. लोक इकडे तिकडे पळू लागले आणि गोंधळ उडाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना होती.
हे ही वाचा :
१० वर्षात भारताचा जीडीपी दुप्पट
गाझा येथे इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचा नेता सलाह अल-बर्दावील ठार
भगवान आदिनाथ जन्म कल्याणक महोत्सव : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता झाल्या सहभागी
जम्मू-काश्मीर : डोडा जिल्ह्यात शस्त्रास्त्र साठा आणि दारुगोळा जप्त
रथ इतके उंच का बनवले जातात?
दरम्यान, पूर्वी गावातील रथ साधे असायचे. २०२१ मध्ये, सर्वात उंच रथाची शर्यत सुरू झाली. मंदिर अधिकाऱ्यांनी ‘सर्वोत्तम रथासाठी’ रोख बक्षीस जाहीर केले. तरुणांना पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा करण्यास प्रोत्साहित करणे हा यामागील उद्देश होता. एका रहिवाशाने सांगितले की, प्रत्येक गावाला सर्वात उंच रथ बांधून स्पर्धा जिंकायची होती, त्यामुळे रथ उंच होत गेले. मंदिर अधिकाऱ्यांनी रोख बक्षिसे देणे बंद केले, परंतु त्यामुळे तरुणांना उंच रथ बांधण्यापासून रोखता आले नाही.