पहलगाम हत्याकांडामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या १५ स्थानिक काश्मिरी ओव्हरग्राउंड वर्कर्स आणि दहशतवादी सहाय्यकांची ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवण्याच्या माध्यमातून हे संशयित समोर आले आहेत. त्यांच्यावर पुरवठा व शस्त्रास्त्र पाठवण्याची जबाबदारी असल्याचा संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात पाच मुख्य संशयितांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यापैकी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उर्वरित दोन स्थानिकांचा शोध घेत आहेत. या पाचही जणांची हत्याकांडाच्या दिवशी आणि आधीही परिसरात उपस्थिती होती आणि त्यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन त्यावेळी सक्रिय होते.
इलेक्ट्रॉनिक पाळतीत एका संभाषणाचा खुलासा झाला आहे, ज्यामध्ये ताब्यात घेतलेल्या तीन संशयित ओव्हरग्राऊंड वर्कर्सनी पहलगाममध्ये असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांबद्दल चर्चा केली आणि त्यांना “मदत कशी करायची” याबाबत बोलले.
हे ही वाचा:
“इच्छा तिथे मार्ग”, मुख्यमंत्र्यांनी ‘मन कि बात’चा भाग गाडीतच पाहिला!
‘पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे चार तुकडे करतील’
घाटकोपर: सोमय्यांच्या तक्रारीनंतर मुस्लीम जमात गौसिया मशिदीचे भोंगे उतरवले!
मणिपूरमध्ये १० दहशतवाद्यांना अटक!
२०० हून अधिक लोक चौकशीसाठी ताब्यात
दरम्यान, हल्ल्याच्या आधीच्या घडामोडींचा मागोवा घेण्यासाठी २०० पेक्षा अधिक ओव्हरग्राऊंड वर्कर्सना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी सांगितले की, पहलगाम हत्याकांडात या पाच संशयित ओव्हरग्राऊंड वर्कर्सची भूमिका असल्याचे पुरेसे परिस्थितिजन्य पुरावे आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA), जम्मू-कश्मीर पोलीस, गुप्तचर विभाग (IB) आणि RAW च्या संयुक्त चौकशी पथकाकडून १० इतर स्थानिक कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. हे सर्व लोक यापूर्वीही पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना मदत करत होते आणि हल्ल्याच्या दिवशी परिसरात उपस्थित होते.
हे १५ स्थानिक दहशतवादी सहाय्यक – सर्व दक्षिण काश्मीरमधील – यांची जम्मू-कश्मीर पोलिसांकडे आधीच OGWs म्हणून नोंद आहे. ते पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना लॉजिस्टिक मदत, जंगलातून मार्गदर्शन आणि शस्त्रास्त्र पोहोचवण्यास मदत करत होते.
दहशतवादी अजूनही घनदाट जंगलात लपले असण्याची शक्यता
बैसरानच्या आजूबाजूच्या जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम आणखी तीव्र केली आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये हल्लेखोरांचे कोणतेही ठसे मिळालेले नाहीत. त्यामुळे संशय आहे की ते अद्यापही बैसरानच्या घनदाट जंगलात लपले असू शकतात.