26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरविशेषभीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे!

भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष आहेत.

Google News Follow

Related

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती आहे. १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीदिन आमच्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता कारण्याची शक्ती देणारा दिवस आहे. एप्रिल म्हटले की पहिली आठवण येते ती १४ एप्रिलची. भीमजयंतीची. डॉ. आंबेडकर जयंतीची वर्षभर आंबेडकरी जनता वाट बघते आणि भीमजयंती दिवाळीसारखी साजरी करते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते.

यंदा १४ एप्रिलला झारखंडच्या धनबादपासून जवळ असणाऱ्या दामोदर व्हॅलीतील मैथल डॅम येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या भागात दामोदर व्हॅलीमुळे मोठी हरित क्रांती झाली आहे. दामोदर नदीला येणाऱ्या महापुरामुळे बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसामध्ये खूप नुकसान व्हायचे. त्यामुळे दामोदर नदीवर ७ धरणे उभारून तयार झालेला दामोदर व्हॅली प्रकल्प ऐतिहासिक ठरला आहे. १९४३ मध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉय मंत्रिमंडळात मजूर मंत्री असताना त्यांनी खूप कष्ट घेऊन दामोदर व्हॅली उभारली. दामोदर व्हॅली बरोबर भाक्रा नांगल, सोन रिव्हर प्रोजेक्ट, हिराकुड धरण यांची मुहूर्तमेढ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. धरणे बांधणे, जल सिंचन, ऊर्जा, विद्युत निर्मिती याबाबत देशाला पहिल्यांदा सजग करण्याचे काम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

एप्रिलचा संपूर्ण महिना आंबेडकर जयंती साजरी होते. एप्रिलच्या सुरुवातीला १ एप्रिलला रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस साजरा होतो. रिझर्व्ह बँकेची स्थापना ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधानुसार झाली. त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करीत रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिन साजरा होतो.

भारताची अर्थव्यवस्था मजबूत करून देशाला महासत्ता करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मार्गदर्शक आहेत. संविधानातील भारत साकार केल्यास भारत जागतिक महासत्ता होईल. डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य वर्गाला स्पृश्यास्पृश्यतेच्या अमानुष भेदभावाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले. गावकुसाबाहेर असणाऱ्या या बहिष्कृत समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले. निरक्त क्रांतिपर्वाचे उद्गाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समतेच्या युगाचे युगप्रवर्तक महापुरुष आहेत.

हे ही वाचा:

देशातील नवीन कोरोना रुग्णांची ११ हजारांच्या पुढे; सक्रिय रुग्णांची संख्येतही लक्षणीय वाढ

प्रखर धर्माभिमानी काजल हिंदुस्थानी यांना अखेर जामीन मंजूर

म्हणजे संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदावर पाणी सोडले तर…

मास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या

संविधानाचे शिल्पकार म्हणून भारताचे भाग्यविधाते; आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते ठरलेल्या डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आणि सर्व देशवासीयांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आहे. बहिष्कृत अस्पृश्य समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना राष्ट्रप्रेमाची शिकवण डॉ. आंबेडकर यांनी दिली. त्यांनी व्यक्तिपूजेला विरोध केला. मात्र, राष्ट्रभक्ती; राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली. त्यासाठी ते नेहमी म्हणत असत की मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे, या विचारातून डॉ. आंबेडकर राष्ट्रप्रेमाची शिकवण देत होते.

 

संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर आधुनिक भारताचेही शिल्पकार ठरतात. डॉ. आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संसदीय लोकशाहीसाठी भारतीय संविधान जगात आदर्श संविधान म्हणून नावाजले गेले आहे. सामाजिक समता; आर्थिक समता; धर्मनिरपेक्षता; सर्वधर्मसमभाव; बंधुता; सामाजिक न्याय; स्वातंत्र्य; या मूल्यांमुळे भारतीय संविधान मजबूत आहे. आणि संविधानामुळे भारतीय संसदीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून मजबूत उभी आहे.

भारतीय लोकशाहीचा झेंडा उंच डोलाने फडकत असून त्याचा मजबूत पाया भारतीय संविधान आहे. त्यामुळे, लोकशाहीचा प्राण ठरलेले भारतीय संविधान प्रत्येक देशवासी मानत आहे. प्रत्येक माणूस संविधान मानत आहे. जो संविधान मानत नाही, त्याला भारतात राहण्याचा अधिकार नाही. संविधान प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. संविधनातून डॉ. आंबेडकरांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. सर्वांनी आपआपला धर्म पाळला पाहिजे. मात्र, इतरांच्या धर्माचाही आदर केला पाहिजे. मात्र, धर्मावरून तेढ निर्माण होता कामा नये. धार्मिक भेदभावातून देशात फूट पडता कामा नये.

 

डॉ. आंबेडकरांनी जात, धर्म, प्रांत, भाषा यांच्यापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ असल्याचा उपदेश केला आहे. त्यातून त्यांनी आपणास राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती शिकविली आहे. त्यामुळे, आम्ही राष्ट्राभिमानी आहोत. डॉ. आंबेडकरांनी सांगितल्यानुसार जाती-जातीतील धर्मा-धर्मातील संघर्ष मिटला पाहिजे. त्याप्रमाणे, देशात यश मिळत आहे. जाती-धर्मातील संघर्ष मिटत चालला आहे. मात्र, अजूनही काही प्रमाणात दलित तसेच आदिवासींवर अत्याचार होतात. धार्मिक जातीय संघर्ष होतात. वाद होतात. जातिधर्माचे होणारे वाद संपूर्णतः संपले पाहिजेत. जातिभेद, धर्मभेद हे सर्व भेदभाव मिटवून समतावादी भारत साकारला पाहिजे. आपण जातिधर्माचे गर्व बाळगण्यापेक्षा भारतीय म्हणून राष्ट्राभिमानी झालो पाहिजे. आपण प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच असलो पाहिजे. अशी राष्ट्रप्रेमाची भावना मनामनात जागी करणे, हेच खरे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी अभिवादन ठरेल!

-खासदार रामदास आठवले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा