भारतीय रिझर्व्ह बँकेने २३ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतल्यापासून स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आतापर्यंत दोन हजार मूल्याच्या १४ हजार कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. सोमवारी गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी ही माहिती दिली. तसेच, बँकेत दोन हजारांच्या नोटांच्या बदल्यात तीन हजार कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली.
चलनातून रद्द केलेल्या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी तसेच, अन्य व्यवहारांसाठी त्याचा वापर करण्याकरिता ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिल्याने लोक चिंताग्रस्त नाहीत. बँकेनेही यासाठी वेगळी व्यवस्था केली असल्याने चिंतेचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जेव्हा भारताचे राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न सध्याच्या ३.५ ट्रिलियन डॉलरवरून ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, तेव्हा एसबीआयचा ६० अब्ज डॉलरचा आंतरराष्ट्रीय ताळेबंद २०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास अध्यक्ष खेरा यांनी व्यक्त केला.
गॅरेजचा दोन हजारांच्या नोटा घेण्यास नकार; बदल्यात गाडी ठेवून घेतली
वडोदरा : वडोदराच्या वकिलासाठी नियमित गाडीची देखभाल करणे हा त्रासदायक अनुभव ठरला आहे, कारण कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरने त्यांची गाडी परत देण्यास नकार दिला आहे. या वकिलाने आपण दोन हजारांच्या चलनी नोटांतच पैसे देण्याचा आग्रह धरला होता. मात्र या सर्व्हिस सेंटरने त्यास नकार दिल्याने हा वाद पोलिस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला आहे.
हे ही वाचा:
उद्धवजी तुम्ही दिलेली मुदत संपली, आता…?
इस्रोचा ‘नाविक’ उपग्रह अवकाशात झेपावला
आयपीएलविजेत्या चेन्नईवर पैशांचा पाऊस
१७०० कोटींच्या घोटाळ्याशी उद्धव ठाकरेंचा काय संबंध?
कारमालक जयदीप वर्मा यांनी २७ मे रोजी किरण मोटर्स लिमिटेडच्या सर्व्हिस सेंटरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार दाखल केली. वर्मा यांनी २६ मे रोजी त्यांची कार सर्व्हिसिंगसाठी दिली. बिलाची रक्कम सहा हजार ३५२ रुपये झाली. वकिलाने ड्रायव्हरला गाडी घेण्यासाठी पाठवले असता, वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा घेण्यास नकार दिला. “माझा ड्रायव्हर अकाऊंट्स विभागातही गेला होता, पण ते नोटा स्वीकारणार नाहीत,’ असे सांगण्यात आले. ते दुसऱ्या मूल्यामध्ये पैसे दिल्याशिवाय माझी गाडी सोडणार नाहीत, असे त्यांनी सांगितल्याचा दावा वर्मा यांनी केला.
सर्व्हिस सेंटरचे व्यवस्थापक केतन पटेल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘बँकेच्या नोटा चांगल्या अवस्थेत नसतील, त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या स्वीकारण्यास नकार दिला असावा. आमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारण्याचे कोणतेही धोरण नाही. मात्र आम्ही इतर काही पद्धतीने बिल भरण्याचा पर्यायही दिला होता,’ असे स्पष्टीकरण दिले.