पाणलोट विकास घटक योजनेसाठी १४३.०४ कोटींचा निधी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

पाणलोट विकास घटक योजनेसाठी १४३.०४ कोटींचा निधी

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत – पाणलोट विकास घटक २.० ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे १४३.०४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

मंत्री राठोड म्हणाले की, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २.० ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण – केंद्र : राज्य (६० : ४०) असून, योजनेचे प्रकल्पमूल्य रु.१३३५.५६ कोटी इतके आहे. हा प्रकल्प राज्यातील ३० जिल्ह्यांतील १०२ तालुक्यातील १६०३ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण ५,६५,१८६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेंतर्गत उपजीविका घटकांतर्गत प्रकल्प मूल्याच्या १५ टक्के निधीची तरतूद असून, उपजीविका हा घटक ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या यंत्रणेमार्फत त्यांच्या आर्थिक निकषानुसार राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे रु.१४३.०४ कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा..

जलाशयाच्या पुनर्बांधणीसंदर्भात नागरिकांची समिती गठित करावी

कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्या

रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड

गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा

उपजीविका घटक अंतर्गत प्रत्येक पाणलोट प्रकल्पात फिरता निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना रु. ३० हजार व प्रभाग संघामार्फत समुदाय गुंतवणूक निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना रु.६० हजार याप्रमाणे वितरित करण्यात येणार असून, प्रत्येक प्रकल्प क्षेत्रात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत प्रभाग संघ व स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरित करण्यात येणार असून पात्र स्वयं सहाय्यता गट व प्रभाग संघ यांना निधी पाणलोट समितीच्या शिफारशीने वितरित करण्यात येईल.

Exit mobile version