देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जवळपास ८० हून अधिक पालिकेसह खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. मुंबईतील लोकसंख्या आणि लसीकरण केंद्रांच्या संख्येचा विचार करता पालिकेने प्रथम ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यामुळे विशेषत: अपंग लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता वाहनात बसून कोरोना लस घेता येत आहे. दादरमध्ये देशातील हे पहिलेच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लवकरच पालिकेकडून १४ ठिकाणी अशाप्रकारे ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु केली जाणार आहे.
मुंबईतील दादर परिसरातील कोहिनूर टॉवर येथील पार्किंगमध्ये ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. अपंग लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे न राहता लस घेता यावी, या उद्देशाने या केंद्राची स्थापना करण्यात आली. यावेळी ज्यांना लस घ्यायची आहे, त्यांनी एका पार्किंग गेटने आत जायचे. त्यानंतर गाडीमध्येच बसून लस घ्यायची आणि मग वेगळ्या एक्झिट पॉईंटमधून बाहेर पडायचे, असा ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा प्लॅन असतो.
हे ही वाचा:
शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबणार
संगमनेरमध्ये जमावाकडून पोलिसांवर हल्ला
विशेष म्हणजे केवळ ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’च नाही तर या ठिकाणी वॉक इन सेटअपही लावण्यात आला आहे. त्याठिकाणी ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना आत प्रवेश करून लस दिली जाईल. दरम्यान या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन केंद्राची युक्ती यशस्वी झाल्यानंतर आता पालिकेने अशाप्रकारची केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.