शेतकऱ्याने एकाच झाडावर भरवले विविध जातीच्या १४ आंब्यांचे ‘संमेलन’

शेतकऱ्याने एकाच झाडावर भरवले विविध जातीच्या १४ आंब्यांचे ‘संमेलन’

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील अमरेली येथील एका शेतकऱ्याने लुप्त होत चाललेल्या आंब्यांची वाणं शोधून ती पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने एकाच झाडावर १४ विविध प्रकारचे आंबे पिकवण्याची किमया केली आहे.

प्रामुख्याने केसर आंबा पिकवणारे धारी तालुक्यातील डितला गावाचे उकाभाई भट्टी या शेतकऱ्याने जुन्या, लुप्त होत चाललेल्या आंब्यांचा जणू अल्बमच उघडला आहे. त्यांच्या झाडाच्या फांद्यांवर १४ वेगवेगळ्या जातींचे आंबे कलम करून त्यांनी त्यांचे संगोपन केले आहे. त्यामुळे भट्टी यांच्या झाडाला आंब्यांचे संमेलनच भरले आहे की काय, असा भास होतो.

त्यांच्या या जादुई झाडाला होळीपासून दिवाळीपर्यंत आंबे लागतात. मात्र इतके करूनही भट्टी हे थांबलेले नाहीत. ते त्यामध्ये आणखी विविधता आणण्याच्या प्रयत्नात आहेत. ७०च्या दशकात त्यांनी जुनागढच्या नवाबाच्या काळात उपलब्ध असलेल्या वाणांसह काही कलमांची सहा वर्षांहून अधिक काळ लागवड केली. नलीयेरो, गुलाबीयो, सिंदोरीयो, दादमो, कालो जमादार, कॅप्टन, पायलट, वरियालीयो, बदाम, सरदार, श्रावणीयो आणि आषाढियो… ही त्यातली काही नावे.

‘नवाबाच्या काळात २००पेक्षा जास्त जातींच्या आंब्याचे संगोपन केले जात असे. आजपर्यंत फक्त केसरच टिकून आहे आणि तो तितकाच लोकप्रिय आहे,’ अशी माहिती भट्टी यांनी दिली. “मी हे पुढच्या पिढीसाठी करत आहे. त्यांनी आपल्या प्रदेशातील आंब्याच्या समृद्ध जातींबद्दल अनभिज्ञ नसावे, हा माझा यामागचा हेतू आहे. मी घरी लागवड केली आहे आणि ही फळे विक्रीसाठी नाहीत, कारण प्रत्येक जातीचे उत्पादन फक्त काही किलो आहे. ते माझ्या कुटुंबाच्या वैयक्तिक वापरासाठी आहे,’ असेही ते आवर्जून सांगतात.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या भवितव्याचा निर्णय उन्हाळी सुट्टीनंतर

राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

मुंबईत आता राहिली फक्त दोन विमानसेवांची कार्यालये!

११० वर्षांपूर्वी पहिला भारतीय चित्रपट झाला होता प्रदर्शित! चित्रपटाबद्दल ‘या’ रंजक गोष्टी जाणून घ्या

त्यांच्याकडे चार दशकांपूर्वी ४४ जातींचे आंबे असलेले एक झाड होते, जे त्याचे आयुष्य संपल्यानंतर नष्ट झाले. ‘मला एका पुस्तकात काही देशी आंब्यांची नावे सापडली, जी आता नामशेष होत आहेत. मी त्यांचा महाराष्ट्र, राजस्थानमधील कृषी विद्यापीठासह देशातील विविध भागांत आणि डांगच्या जंगलातही शोध घेतला. मला काही जाती सापडल्या, पण काहींना नावं नव्हती,’ अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी या वनजातींना त्यांचा दर्जा आणि रंगानुसार नावे दिली- ठळक रंगाच्या आंब्याला ‘कॅप्टन’ असं नाव दिलं किंवा काळी साल असणाऱ्या आंब्याला ‘कालो जमादार’ असे नाव दिले.

Exit mobile version