सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातातील १४ पैकी १३ जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आता समोर येत असून एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करत ही माहिती दिली आहे. सीडीएस म्हणजे सुरक्षा दलांचे प्रमुख बिपिन रावत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूर येथे रावत यांच्यासह १४ जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर सकाळी कोसळले.
दरम्यान, यानिमित्ताने घडामोडी वाढल्या असून लष्करप्रमुख मनोहर नरवणे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना या दुर्घटनेसंदर्भात माहिती दिली आहे.
वेलिंग्टन येथे बिपिन रावत यांचे सैनिकी शाळेत व्याख्यान होते. ते आटोपल्यानंतर ते हेलिकॉप्टरने रवाना झाले. त्यावेळी कुन्नूर येथे हे हेलिकॉप्टर कोसळले आणि त्या हेलिकॉप्टरला आग लागली तसेच आजुबाजुची झाडेही जळून गेली. हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते त्यापैकी १३ जण मृत्युमुखी पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा:
कोण आहेत देशातील पहिले सीडीएस बिपिन रावत?
पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार
सत्ताधाऱ्यांचा ८४० कोटींचे प्रस्ताव आणण्याचा डाव भाजपाने उधळला
अमेरिकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही चीनच्या ऑलिंपिकवर बहिष्कार
या दुर्घटनेसंदर्भात राजनाथ सिंह लोकसभेत माहिती देणार आहेत. उद्या यासंदर्भातील निवेदन राजनाथ सिंह सादर करणार आहेत.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी या घटनेबद्दल धक्का बसल्याची प्रतिक्रियाही दिली. दरम्यान, कॅबिनेटची बैठक संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी या दुर्घटनेचा विषय चर्चेला असेल अशी शक्यता आहे.
ही घटना घडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. तिन्ही दलांचे प्रमुख असलेले सीडीएस हे नवे पद निर्माण करण्यात आले होते. हा सन्मान बिपिन रावत यांना देण्यात आला. रावत हे भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुखही होते.