महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्या झाल्या संकेतस्थळाला अवघ्या तासाभरात तब्बल साडेतीन कोटी ‘हिट्स’ आल्याची बाब समोर आली आहे. बारावीचे अवघे १३ लाख विद्यार्थी असून इतके हिट्स आल्यामुळे हा एक सायबर हल्ला असून अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झालेल्या दहावी निकालाचे संकेतस्थळ कोसळण्यामागेही अशाच घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर संकेतस्थळ कोलमडू नये म्हणून मंडळाने आपल्याच पाच वेगवेगळ्या संकेतस्थळांवर निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. प्रत्येक संकेतस्थळांच्या हिट्सची क्षमताही १ कोटी पर्यंत वाढवण्यात आली होती. मंडळाचे आणि शालेय शिक्षण विभागातील अधिकारी या पाचही संकेतस्थळांवर लक्ष ठेऊन होते. तेव्हा पहिल्या तासाभरातच साडेतीन कोटी हिट्स मिळाले आणि संध्याकाळपर्यंत हा आकडा पाच कोटींवर गेला होता. बारावीचे केवळ १३ लाख १९ हजार विद्यार्थी असताना इतक्या हिट्स कशा हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये आयसिसचे सुसाईड बॉम्बर्स
अनिल देशमुखांच्या सहाय्यकांवर ईडीचे आरोपपत्र
टॅबचे पैसेच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करा!
खासगीकरणाच्या मार्गावर धावू लागली लालपरी
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होण्याच्या आधी मंडळाचे संकेतस्थळ कोलमडून पडले होते. १६ जुलैला दहावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार होता, पण १२.५८ च्या सुमारास संकेतस्थळ कोलमडून पडले होते. ते पाच ते सहा तासांनी पूर्वपदावर आले होते. तोपर्यंत विद्यार्थी, पालक आणि शाळा चालक यांना निकाल पाहता आले नव्हते. या गोंधळानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. बारावीच्या निकालादरम्यान अशा समस्या होऊ नयेत म्हणून तांत्रिक उपाययोजना केल्या.
पाचही संकेतस्थळांची क्षमता वाढवली नसती तर पाच कोटी हिट्समुळे दहावीप्रमाणे बारावी निकालाचे संकेतस्थळही कोसळले असते. हा प्रकार घातपाताशिवाय शक्य नाही. त्यामुळे या प्रकाराला सायबर हल्लाच म्हणायला हवे, असे शालेय शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. दहावीच्या निकालादरम्यानही असे काही घडले असल्याची शक्यता असल्यामुळे तसा तपास सुरू आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता इतके हिट्स येण्याचे कारण नव्हते. पुरेशी तयारी असल्यामुळे संकेतस्थळ कोसळले नाही. या सायबर हल्ला होता की नाही हे तपासातून समोर येईल. पण यापुढे निकाल जाहीर करताना अधिकची काळजी घेतली जाईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.