केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
येत्या काही दिवसांत देशातील १२ ते १८ वयोगटातील मुलांना झायडस कॅडीलाची लस देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितली आहे. केंद्र सरकारने एक प्रतिज्ञापत्रक न्यायालयात सादर केलं असून त्यात असंही सांगितलं आहे की, १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी कोरोना लसीचे १८६.६ कोटी डोस आवश्यक आहेत. झायडस कॅडीलाची झायकॉव्ह-डी ही लस जगातील पहिलीच डीएनए आधारित लस आहे.
झायडस कॅडिलाच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली असून ती आता मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. केंद्र सरकारने देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली असून २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. त्यासाठी केंद्र सरकार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून लस खरेदी करेल आणि त्या लसी सर्व राज्यांना मोफत देईल असंही सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलं आहे.
भारतातील १८ वर्षांवरील लोकसंख्या ही अंदाजे ९३ ते ९४ कोटी इतकी आहे. त्यामुळे त्याच्या लसीकरणासाठी १८६ ते १८८ कोटी डोस लागतील असा अंदाज केंद्र सरकारला आहे. भारत सरकारच्या वतीनं लोकांच्या सुरक्षेसाठी आणि परिणामकारक लसीकरणासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत असल्याचं केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे. जानेवारी २०२१ पासून सुरु झालेल्या लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी वापरण्यात येत आहेत.
भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या झायडस कॅडीला कंपनीकडून त्याच्या झायकॉव्ह-डी या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे तशा प्रकारची विनंती करण्यात आली असून या लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली डीएनए आधारित लस असणार आहे. झायडस कॅडीलाची झायकॉव्ह-डी ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नका
आरबीआयच्या निर्णयाने ‘अर्थतज्ज्ञ’ राजकारणी अडचणीत
जम्मू काश्मीरनंतर लडाखच्या नेत्यांसोबत केंद्राची बैठक
भारतात आतापर्यंत तीन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडीलाच्या झायकॉव्ह-डी लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची आकडेवारी तयार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी झायडस कॅडीलाने २८,०० स्वयंसेवकांचा वापर केला होता. त्याचा अहवाल आता ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे जमा करण्यात आली आहे. ही लस १२ ते १८ वयोगटातील बालकांसाठीही उपयुक्त असेल असं सांगण्यात आलं आहे.