चीनमधील गान्सू-क्विंघाई सीमाभागात मंगळवारी झालेल्या भूकंपात सुमारे १११ जण ठार आणि २३०हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. द युरोपियन मेडिटेरिअन सीसमोलॉजिकल सेंटरने भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ नोंदवली आहे. तर, चिनी प्रसारमाध्यमांनी मात्र हा भूकंप ६.२ मॅग्निट्यूडचा असल्याचे सांगितले आहे.
गान्सू प्रांताच्या राजधानीचे शहर असणाऱ्या लांझोऊपासून १०२ किमी अंतरावर आणि ३५ किमी खोल या भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे नेमकी किती माणसे बेपत्ता आहेत, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. भूकंपावेळी क्विंघाऊ प्रांतातील अनेक भागांत जोरदार धक्के जाणवले. चीनच्या आपत्कालीन परिस्थिती निवारण विभागाने तातडीने मदतकार्याला सुरुवात केली आहे. भूकंप झाला ते ठिकाण उंच ठिकाणी असून तेथील वातावरणही अति थंड आहे.
हे ही वाचा:
तामिळनाडूत पुरामुळे हाहाःकार; रेल्वे स्थानकावर ८०० प्रवासी अडकले
ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक घेणार त्यांची जागा
सोन्या- चांदीने, अनमोल रत्नांनी सजल्या रामलल्लाच्या पादुका!
भूकंपामुळे अन्य काही आपत्ती उद्भवू नये, यासाठी बचाव पथके सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ज्या ठिकाणी भूकंप झाला, त्या गान्सू येथील लिंक्सिया भागात मंगळवारी सकाळी उणे १४ अंश सेल्सिअस तापमान होते. चीनच्या बहुतेक भागांत गेल्या आठवड्यापासूनच थंडीची लाट आली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अनेक भागांत पाणीपुरवठा, वीज, वाहतूक, संपर्क यंत्रणा आणि अन्य पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे समजते. मात्र अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मंगळवारी पहाटेच्या आधी ३ मॅग्निट्यूडचे सुमारे नऊ भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त चिनी प्रसारमाध्यमांनी दिले आहे.