नेपाळमध्ये पावसाने कहर केला आहे. संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे तब्बल ११२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये ६८ लोक बेपत्ता असून लोकांना शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दावा केला की, पूर आणि भूस्खलनाच्या २०० घटनांची नोंद झाली आहे, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये २२६ घरे उद्ध्वस्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी (२८ सप्टेंबर) नेपाळमध्ये २४ तासांत ३२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, जो ५४ वर्षांतील विक्रमी पाऊस ठरला. राजधानी काठमांडूच्या सभोवतालच्या नद्यांनी त्यांचे किनारे फुटले आणि जवळपासच्या घरांमध्ये पाणी शिरले. काठमांडूची मुख्य नदी बागमतीही मुसळधार पावसामुळे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) चे हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञ अरुण भक्त श्रेष्ठ म्हणाले, काठमांडूमध्ये मी याआधी कधीच इतक्या प्रमाणात पूर आलेला पाहिला नव्हता.
हे ही वाचा :
जम्मू-काश्मीरमधील मौलवी म्हणाले, योगी साहेब ‘राम-राम’
अलौकीक प्रतिभेसमोर नतमस्तक व्हा…
नाव जाहीर करायला लाज का वाटते ?
हिजबुल्लाचा प्रमुख नसरल्लाचा मृत्यू, संघटनेनेच केले शिक्कामोर्तब
दरम्यान, पंतप्रधान आणि शहरी विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृह सचिव आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून शोध आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.