सुरत मध्ये राहणाऱ्या भाविक या अकरा वर्षीय मुलीने अयोध्येतील राम मंदिरासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी दान केला आहे. तिने स्वतः हा निधी जमा केला असून यासाठी तिने रामकथेचा कार्यक्रम केला आहे.
अयोध्येत होऊ घातलेल्या भव्य राम मंदिरासाठी सुरु असलेल्या निधी संकलनाला समाजाच्या प्रत्येक स्तरातून भरहरुन प्रतिसाद मिळत आहे. सर्व समाज यात हिरिरीने सहभाग घेत असताना लहान मुलेही यात मागे नाहीत. विविध माध्यमातून साठवलेले पैसे या राष्ट्रीय कार्यात ही मुले अगदी सढळ हस्ते दान करत आहेत. यातच आता सूरतच्या अकरा वर्षीय भाविकाचे उदाहरण समोर आले आहे. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी आपणही काहीतरी योगदान द्यावे या विचाराने भारलेल्या भाविकाने चार ठिकाणी रामकथेचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. भाविकाने जमवलेला हा निधी तिने राम मंदिरासाठी तर दान केला आहेच, पण त्यासोबतच समाजातील लोकांनी राम मंदिरासाठी निधी द्यावा यासाठी लोकजागृतीही करत आहे.
लॉकडाऊनच्या काळात भाविकाने रामायणाचा अभ्यास केला. रामकथा सांगताना भाविका राम मंदिराविषयी आवर्जून बोलते. ‘राम मंदिर हे खऱ्या अर्थाने राष्ट्र मंदिर आहे’ असे भाविका आपल्या रामकथेतून सांगते.