भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथक मध्यप्रदेशातील जगप्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पात सर्वेक्षण करत आहे. हे सर्वेक्षण करत असतांना पुरातत्व पथकाला बांधवगडमध्ये ऐतिहासिक खजिना सापडला आहे. या पथकाला ११ गुहा, २ स्तूप सापडले आहेत. त्याचबरोबर १५०० वर्षे जुनी खडकांवर रेखाटलेली चित्रे सापडली आहेत. या भागात पहिल्यांदाच अशा प्रकारची चित्रे आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.
बांधवगड ४४८ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. बांधवगड किल्ला ८११ मीटर उंच असून त्याच्याजवळ लहान-लहान टेकड्या आहेत. याआधी देखील या भागामध्ये प्राचीन मंदिरे आणि गुहा सापडल्या आहेत. अनेक प्राचीन दुर्मिळ शिल्पे आणि गुहांच्या आतून सापडलेले विशेष शिलालेख जबलपूर पुरातत्व सर्वेक्षणाच्या पथकांनी शोधून काढले आहेत. पुरातत्वशास्त्राचे अनेक अवशेषही येथे आहेत.
दरवर्षी पुरातत्व विभाग सर्वेक्षण करून नवनवीन शोध लावत असतो. मागील वर्षी देखील या पथकाने बांधवगडमध्ये सर्वेक्षण केले होते. यावर्षीच्या सर्वेक्षणाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून ते ३० जूनपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी सर्वेक्षण करताना पुरातत्व पथकाला १५०० वर्षे जुनी दगडांवर काढलेली चित्रे आणि १८०० ते २००० वर्षे जुने मानवनिर्मित जलस्रोत सापडले आहेत. बांधवगड राष्ट्रीय अभयारण्यात २००० वर्षांपूर्वीच्या समाजाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत.
हे ही वाचा:
इम्रानच्या पक्षाच्या रॅलीत ईश्वरनिंदा करणाऱ्या मौलवीला केले ठार
नेपाळी शेर्पांना आता नकोशी झाली आहे पर्वतराजींची वाट!
‘द केरळा स्टोरी’ला विरोध करणारे आयसीसचे समर्थक
ऑपरेशन कावेरी म्हणजे ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा डंका
बांधवगड राष्ट्रीय उद्यानातही अनेक गुहा आहेत. आता सर्वेक्षणात तवबा-बंज गुहाही आढळून आली आहे. बांधवगडच्या तळा भागात सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात ११ दगडी गुहा आढळल्या आहेत तसेच दोन स्तूपही सापडले आहेत, ज्यावर संशोधन सुरू आहे. बांधवगड परिसर हा एकेकाळी व्यापाऱ्यांचा व्यापार मार्ग होता. या मार्गावरून जाणारे व्यापारीही येथे मुक्कामाला असायचे. बांधवगडमध्ये अनेक मानवनिर्मित पाणवठ्यांवरून त्या काळात लोक येथे राहत असल्याचा पुरावा आहे. हे पाणवठे उंचावर बांधलेले आहेत आणि त्याचा उपयोग पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी केला जायचा असे पुरातत्व पथकाचे म्हमाणे आहे.