मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!

दहावी परीक्षेचे केंद्र असलेल्या परेल येथील आर. एम. भट शाळेच्या समोरील रस्त्याचे काम सुरू

मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!

राज्यभरात सध्या विकासकामांचा सपाटा सुरू असून अगदीच काही दिवसांवर आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन या विकासकामांना मार्गी लावण्यासाठी जोर धरू लागला आहे. त्यामुळे मुंबईत विविध ठिकाणी खोदकामे करून ठेवली आहेत. मेट्रोची कामे, रस्त्यांची कामे मार्गी लावताना अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना, वृद्धांना त्रास होत असतोच पण याचा फटका आता विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेली इयत्ता दहावीची परीक्षा सध्या राज्यभरात सुरू आहे. यां दहावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या खोदकामाचा त्रास सहन करावा लागत आहे. परेल पूर्व येथील आर. एम. भट शाळेच्या समोरील रस्त्याचे काम सध्या प्रशासनाने हाती घेतले आहे. यामुळे शाळेसमोरील पूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. तसेच कामासाठी लागणारी यंत्रे आणि जेसीबी सारखी अवजड वाहने या काम सुरू असलेल्या ठिकाणी आणून ठेवली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम सुरू असताना विद्यार्थ्यांनाही परीक्षा काळात आवाजाचा त्रास होत असून परीक्षेच्या पहिल्या दिवशीचं दोन ते तीन वेळा लाईट गेल्याची तक्रारही पालकांनी केली आहे.

खोदलेल्या भागातून विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा होत असताना विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची शक्यता असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. परीक्षेच्या काळात या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन या भागात वावरावे लागत असल्याने पालकांनी चिंता आणि संताप व्यक्त केला आहे. परीक्षा काळ लक्षात घेता रस्त्याचे काम काही काळासाठी पुढे ढकलता येऊ शकले असते किंवा परीक्षेपूर्वी करून घेता आले असते, असे पालकांचे म्हणणे आहे. दहावीची परीक्षा ही साधारण १ मार्च रोजी सुरू होऊन महिनाभर चालते याची कल्पना सर्वांनाच असते त्यामुळे हे रस्त्याचे काम परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन करता आले असते, अशा भावना पालकांनी मांडल्या आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडायला पालक येतात मात्र आता रस्त्याच्या कामामुळे पालकांना शाळेच्या आजूबाजूला उभे राहण्यासही जागा नसल्याचे पालकांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल

राहुल गांधींनी विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास  केली टाळाटाळ; व्हीडिओ व्हायरल

पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम!

अनिल परबांना दणका; दापोलीमधील साई रिसॉर्ट चार आठवड्यात पाडावे लागणार

दहावीच्या विद्यार्थ्यांसोबतचं शाळेत इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते. शिवाय या भागात अनेक इमारती आहेत त्यामुळे इमारतीमधील नागरिकांचाही वावर मोठ्या प्रमाणात असतो. ज्येष्ठ नागरिकांनाही वावरताना विशेष काळजी घ्यावी लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. किमान दहावीची परीक्षा संपेपर्यंत हे काम थांबवून तात्पुरता सुरक्षित मार्ग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

Exit mobile version