महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यंदा दहावीच्या निकालाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. तसेच विभागीय टक्केवारी देखील जाहीर करण्यात आली.
यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून नागपूर विभागाचा निकाल कमी लागला आहे. तसेच यंदाच्या वर्षी निकालात मुलींनी बाजी मारली आहे. राज्याची दहावीच्या निकालाची टक्केवारी ९५.८१ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का वाढला आहे. तर, राज्यात मुलींचा निकाल ९७.२१ टक्के लागला असून मुलांचा निकाल ९४.५६ टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९९ टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४.७३ टक्के लागला आहे.
राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांतून १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,३८२ शाळांचा निकाल १०० % लागला आहे. राज्यात दहावीच्या परीक्षांमध्ये तब्बल ७२ विषयांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या ज्यामध्ये १८ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागलेला आहे.
हे ही वाचा:
अंतरिम जामिनाच्या मुदतवाढीसाठी केजरीवालांची धावाधाव
पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!
फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी; गंभीर- नारायणचा मास्टरस्ट्रोक
मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार
दहावीचा विभागनिहाय निकाल
- पुणे- ९६.४४ टक्के
- नागपुर- ९४.७३ टक्के
- छ. संभाजीनगर- ९५.१९ टक्के
- मुंबई – ९५.८३ टक्के
- कोल्हापूर – ९७.४५ टक्के
- अमरावती- ९५.५८ टक्के
- नाशिक- ९५.२८ टक्के
- लातूर- ९५.२७ टक्के
- कोकण- ९९.०१ टक्के