महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दहावी आणि बारावीचे सविस्तर वेळापत्रक मंगळवारी २१ डिसेंबरला जाहीर केले. त्यानंतर मंडळाकडून विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ वाढवून मिळणार आहे.
दहावी बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्यात येणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने या गोष्टीची दखल घेत हा निर्णय घेतला आहे. ७०, ८०, १०० मार्काचे लेखी परीक्षेचे पेपर असतील त्या पेपर साठी ३० मिनिटे म्हणजेच अर्धा तासाचा अधिक वेळ दिलेला आहे. तर ४०, ५०, ६० गुणांचे लेखी पेपर असतील त्यासाठी १५ मिनिटे अधिक वेळ देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
…म्हणून मोदी सरकारने केली २० यूट्युब चॅनेल बंद
ब्रिटनमधील शीख खासदाराने हिंदू विरोधी ट्विट हटवले
बारावी परीक्षा १५; तर दहावी ४ मार्चपासून
२०१४ नंतर लिंचिंग; मग १९८४ मध्ये काय आंधळी कोशिंबीर होती का?
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर काल परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेबसाईटवर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शाळांना हे वेळापत्रक पाठवण्यात आले आहे. शाळेत पाठवण्यात आलेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवावा असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.
बारावीच्या परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत. १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. त्यानंतर दहावीच्या परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.