राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठीचे मतदान पार पडले असून शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सकाळी सुरुवात होणार आहे. यानंतर राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. यासाठी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या असून ही सर्व प्रक्रिया विनाअडथळा पार पडावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
साधारण २ हजार ७०० कर्मचारी मुंबईतील ३६ मतदारसंघातील प्रक्रियेवर देखरेख करणार आहेत. प्रत्येक मतदारसंघात मतमोजणी होणार असून सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन ३६ स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. यावर सीसीटीव्हीची नजर असून कुठेही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी सुमारे १० हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
याव्यतिरिक्त, या सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मुंबई पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दल नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणी प्रक्रियेवर प्रत्येक मतदारसंघातील रिटर्निंग ऑफिसरचे पर्यवेक्षण असेल. एक पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म- निरीक्षक सहाय्यक यांचा समावेश असलेली एक टीम मोजणीचे व्यवस्थापन करणार आहे.
हे ही वाचा :
उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महत्वाच्या नेत्यांची बैठक!
दिल्लीत ट्रक प्रवेश रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
रेणुकास्वामी हत्या : अभिनेता दर्शनच्या कायदेशीर अडचणी वाढल्या
‘राज्यात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार यावं’
शनिवारी सकाळी ८ वाजता पोस्टल मतांसह मतमोजणी सुरू होणार असून नंतर एक एक निकाल स्पष्ट होणार आहेत. मनपाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात १० विधानसभा मतदारसंघात ५२.५६ टक्के मतदान झाले, तर मुंबई उपनगरातील २६ मतदारसंघांमध्ये ५६.३९ टक्के मतदान झाले. मुंबई शहरात एकूण २५.४३ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी १३.३९ लाखांनी मतदान केले. यामध्ये ७.१० लाख पुरुष आणि ६.२८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. तर मुंबई उपनगरात ७६.८६ लाख नोंदणीकृत मतदारांपैकी ४३.३४ लाख लोकांनी मतदान केले, ज्यात २३ लाख पुरुष आणि २०.३४ लाख महिला मतदार आहेत. राज्यात १५८ राजकीय पक्ष आणि अपक्ष असे मिळून २८८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.