डॉ. हेडगेवारांच्या ‘स्वातंत्र्य’ दैनिकाची शतकपूर्ती!

राष्ट्रहिताचे विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी ‘स्वातंत्र्य’ नावाचे दैनिक काढण्याचा संकल्प

डॉ. हेडगेवारांच्या ‘स्वातंत्र्य’ दैनिकाची शतकपूर्ती!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, उत्कृष्ट वक्ते आणि विचारवंत अशी ओळख आहे. राष्ट्रीय विचार जनमानसात रुजावे यासाठी डॉ. हेडगेवार हे सतत प्रयत्नशील असायचे. हाच उद्देश ठेवून त्यांनी हिंदी भाषेतील ‘संकल्प’ हे वार्तापत्र सुरू केले. यानंतर डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रहिताचे विचार सर्वदूर पोहचवण्यासाठी ‘स्वातंत्र्य’ नावाचे दैनिक काढण्याचा संकल्प केला.

१९२३ च्या मध्यात ‘स्वातंत्र्य’ दैनिकासाठी सहकारी तत्त्वावर स्वातंत्र्य प्रकाशक मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाच्या उभारणीसाठी डॉ. ना. भा. खरे यांच्यासह डॉ. हेडगेवार यांनी वऱ्हाडात संचार केला. मंडळाची पहिली बैठक महाराष्ट्रकार गोपाळ अनंत तथा दादासाहेब ओगले यांच्या अत्तर ओळींतील वाड्यात पार पडली. बैठकीस डॉ. हेडगेवार, डॉ. ना. भा. खरे, विश्वनाथराव केळकर, वासुदेवराव फडणवीस, दादासाहेब ओगले, बळवंतराव मंडलेकर, भय्यासाहेब बोबडे, बाबासाहेब पाध्ये प्रभृती उपस्थित होते. मध्य प्रांतात प्रजापक्ष (अकोला), उदय (अमरावती), लोकमत (यवतमाळ), तरुण भारत (वर्धा), मारवाडी प्रणवीर आणि महाराष्ट्र (नागपूर) ही साप्ताहिके असतानाही दैनिक काढण्याचा डॉक्टर यांचा हा निर्णय अत्यंत धाडसी होता.

प्रकाशक मंडळाची विधिवत नोंदणी आणि दैनिक काढण्याजोगी आर्थिक परिस्थिती जमल्यावर चिटणीस पार्कजवळील बेनिगिरी बुवांच्या मठात ‘स्वातंत्र्य’ दैनिकाचे कार्यालय सुरू करण्यात आले. १७ जानेवारी १९२४ रोजी विश्वनाथराव केळकर यांच्या संपादकत्वाखाली मध्य प्रांत आणि वऱ्हाडातील पहिले दैनिक ‘स्वातंत्र्य’ गोपाळराव ओगले यांच्या नक्षत्र प्रेसमध्ये छापून बेनिगिरी वाड्यातून प्रकाशित करण्यात आले. या दैनिकाची किंमत २ पैसे तर वार्षिक वर्गणी साडेबारा रुपये इतकी होती. ‘स्वातंत्र्य’ अंक हा चार पानांचा होता. दैनिकाच्या शीर्षभागी वऱ्हाड- मध्य प्रांताचे प्रमुख आणि एकटेच दैनिक असे लिहिले होते. ‘स्वातंत्र्य’ दैनिक सोमवार व्यतिरिक्त निघत असे.

डॉ. हेडगेवार हे घरातील आवश्यक कामे आणि सार्वजनिक सभा, संमेलने सोडल्यास आपला उरलेला सर्व काळ बेनिगिरी वाड्यातील ‘स्वातंत्र्य’च्या कार्यालयात बसत असत. लिखाण कमी पडल्यास स्वतः लेख लिहिणे तसेच संपादकांचे लिहिलेलं लिखाण तपासून कमी-अधिक करण्यासाठी डॉ. हेडगेवार सूचना देत असत.

हे ही वाचा : 

… म्हणून १ डिसेंबरपासून ‘ओटीपी’ मेसेज उशिरा मिळणार!

शिवसेना उबाठाचे आमदार महेश सावंत लिलावती रुग्णालयात!

संभल मशीद प्रकरण: कनिष्ठ न्यायालयाने ८ जानेवारीपूर्वी कोणतीही कारवाई करू नये!

भांडुपच्या शाळेत विद्यार्थीनिंचा विनयभंग, लिफ्ट मॅकेनिकला अटक!

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘एकोज फ्रॉम अंदमान आणि हिंदुत्व’ या पुस्तकातील प्रकटने ‘स्वातंत्र्य’ दैनिकात येत होती. संपूर्ण स्वातंत्र्य आणि हिंदुत्वाविषयी अनेक जाज्वल्यपूर्ण लेख ‘स्वातंत्र्य’ दैनिकांत येत असत. या दैनिकाला संपादकपदी विश्वनाथराव केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर, गोपाळराव ओगले आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे चार संपादक लाभले. पुढे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने १९२५ च्या सुरुवातीला स्वातंत्र्य प्रकाशन मंडळ बंद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेसाठी डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतःला झोकून दिले. या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेची शतकपूर्ती झाली आहे.

Exit mobile version