अबकी बार १०० पार; आशियाई स्पर्धेत खेळाडूंची शतकी कामगिरी

भारताने आतापर्यंत ९२ पदके जिंकली तर, आठ पदके निश्चित

अबकी बार १०० पार; आशियाई स्पर्धेत खेळाडूंची शतकी कामगिरी

अबकी बार १०० पार असं लक्ष्य घेऊन यंदा भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेमध्ये उतरले होते. हे लक्ष्य भारताने गाठलं असून सध्या भारताच्या खात्यात ९२ पदके आहेत. तर, आठ पदके निश्चित आहेत. त्यामुळे भारताची १०० पदके निश्चित झाली आहेत.

भारतीय खेळाडूंनी यंदाची आशियाई स्पर्धा चांगलीच गाजवली आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी आधीचे अनेक विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. प्रथमच भारताची १०० पदके निश्चित झाली आहेत.

१९५१ पासून ही स्पर्धा खेळली जात आहे. तेव्हापासून ते २०२३ पर्यंत भारताने पहिल्यांदाचं १०० पदकांचा आकडा गाठला आहे. आतापर्यंत भारताने ९२ पदके जिंकली आहेत. तर, आठ पदके निश्चित झाली आहेत. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत २२ सुवर्ण, ३३ रौप्य आणि ३७ कांस्य पदके जिंकली आहेत. याशिवाय तिरंदाजीमध्ये ३, कबड्डीमध्ये २ आणि बॅडमिंटन, ब्रिज, क्रिकेट या खेळांमध्ये प्रत्येकी एक पदक निश्चित आहे. याआधी २०१८ मध्ये भारताने आशियाई स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत ७० पदके जिंकली होती.

भारताने आतापर्यंत ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक २९ पदके जिंकली आहेत. यामध्ये ६ सुवर्ण, १४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. तर, नेमबाजांनीही दमदार कामगिरी करत २२ पदके भारताच्या खात्यात आणली आहेत. यामध्ये ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रथमच भारताने २० सुवर्ण पदकांचा टप्पा गाठला आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी १७ खेळांमध्ये किमान एक पदक जिंकले आहे तर, इतर ३ खेळांमध्ये पदके निश्चित झाली आहेत. म्हणजेच एकूण २० खेळांमध्ये भारताची पदके निश्चित आहेत. आशियाई खेळांच्या इतिहासात कबड्डीमध्ये भारताने आतापर्यंत नऊ सुवर्णपदके जिंकली आहेत. ही कोणत्याही देशाची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०२३ च्या आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी दोन्ही संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

हे ही वाचा:

इराणच्या तुरुंगात कैद असलेल्या नर्गिस मोहम्मदी नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी

गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

यापूर्वी भारताने एकूण सात वेळा ५० पदकांचा टप्पा ओलांडला आहे.

Exit mobile version