भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज, २ ऑक्टोबर रोजी जयंती. २ ऑक्टोबर १९०४ रोजी उत्तर प्रदेशमधील मुघलसराय प्रांतात शास्त्री यांचा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षी आपले शिक्षण सोडून ते महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सामील झाले. गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनापासून ते १९४२ च्या असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यादरम्यान त्यांना अनेकवेळा अटकही झाली.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विश्वासू साथीदारांपैकी शास्त्री एक होते. त्यामुळेच त्यांच्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जून १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरूंचे निधन झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान बनले. त्यांनीच ‘जय जवान, जय किसान’ हा नारा भारताला दिला. ‘हरित क्रांती’चे जनक अशीही त्यांची ओळख आहे.
लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दलच्या खास गोष्टी
- लाल बहादूर शास्त्री यांचे मूळ आडनाव शास्त्री नव्हते. त्यांचे मूळ नाव हे लाल बहादूर शारदा प्रसाद श्रीवास्तव होते. मात्र, १९२५ मध्ये वाराणसीमधील काशी विद्यापीठातून ते जेव्हा संस्कृत शिकून बाहेर पडले तेव्हा त्यांना ‘शास्त्री’ या पदवीने गौरवण्यात आलं. पुढे त्यांनी शास्त्री हेच आडनाव वापरलं आणि तेच नाव प्रचलित झालं.
- १९२० मध्ये लाल बहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभागी झाले. पुढे १९३० मध्ये झालेल्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये शास्त्री यांना अटक झाली आणि त्यांना दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती. याच दरम्यान ते महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनुयायी बनले.
- देशाच्या पंतप्रधानपदी लाल बहादूर शास्त्री रुजू झाले. त्यानंतर १९६५ मध्ये भारत- पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. त्यावेळी देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा शास्त्रींनी परिस्थितीचे भान राखत स्वतःचे मानधन घेण्यास नकार दिला होता. शिवाय एकीकडे युद्धजन्य परिस्थिती तर दुसरीकडे देशात अन्नधान्याचा तुटवडा अशा दुहेरी संकटात देश असताना त्यांनी भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला.
- लालबहादूर शास्त्री खासदार असताना त्यांना घरखर्च भागवणे कठिण जात होते. त्यावेळी खासदारांना ५०० रुपये पगार होता आणि घरात भेटणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी असायची. त्यावेळी घर खर्च भागावा म्हणून लाल बहादूर शास्त्री चार इंग्रजी दैनिकात घोस्ट कॉलम लिहित होते. त्यातून महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे २ हजार रुपये मिळायचे. त्यातून शास्त्रींजीचा अतिरीक्त घरखर्च भागायचा.
- शास्त्रींजीचा लहान मुलगा हरी याचे काही व्यापाऱ्यासोबत घनिष्ठ संबध होते. वडिलांच्या अधिकार पदाचा वापर करुन त्याने काही कामे केल्याचा आरोप हरीवर लागला. हे सर्व लाल बहादुर शास्त्री यांच्या कानावर पडताच, त्यांनी आपल्या शासकीय बंगल्यावरुन मुलाला हाकलून दिले होते.
- पंतप्रधान पदी असतानाही त्यांचे पाय जमिनीवर होते. ते स्वतः कधीच सरकारी गाडी वापरायचे नाहीत. त्यांच्या मुलाने एकदा सरकारी गाडी वापरली आणि ही बाब त्यांना समजताच त्यांनी किलोमीटरच्या हिशोबाने पेट्रोलचे पैसे सरकारी तिजोरीत जमा केले होते.
- भीषण रेल्वे अपघात झाल्यानंतर रेल्वेमंत्री म्हणूण नैतिक जबाबदारी स्वीकारून लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता.
- केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर लाल बहादूर शास्त्रींनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशातील पहिल्या समितीची स्थापना केली होती.
- ११ जानेवारी १९६६ रोजी ताश्कंद येथे त्यांचा मृत्यू झाला. १० जानेवारी १९६६ ला पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष अय्यूब खान यांच्यासोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असे सांगण्यात आले. राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीत लाल बहादूर शास्त्रींचे समाधीस्थळ असून ‘विजय घाट’ म्हणून ते ओळखले जाते.
हे ही वाचा:
फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी
… आणि काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला पूल असा झाला इतिहासजमा