आसाममधील एक हजार २८१ मदरसे कायमचे बंद!

नियमित शाळांमध्ये केले रूपांतर

आसाममधील एक हजार २८१ मदरसे कायमचे बंद!

आसाम सरकारने बुधवारी एक अधिसूचना काढून ३१ जिल्ह्यांमधील एक हजार २८१ मदरशांचे नाव बदलून त्यांचे रूपांतर राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत नियमित शाळांमध्ये केले. शिक्षण मंत्री रनोज पेगू यांनी बुधवारी हे आदेश जाहीर केले. त्यांनी नवीन शाळांची यादी ‘एक्स’वर जाहीर केली. ‘आसाम माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत सर्व सरकारी आणि प्रांतीय मदरशांचे रूपांतर सर्वसाधारण शाळांमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार, शालेय शिक्षण विभागाने सुमारे एक हजार २८१ मदरशांची नावे बदलून मिडल इंग्लिश स्कूल अशी केली आहेत,’ असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, ‘राज्य सरकारच्या मंजुरीनुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयांतर्गत एक हजार २८१ मदरशांची नावे तत्काळ एमई स्कूल म्हणून करण्यात येत आहेत,’ असेही आदेशात नमूद केले आहे.

आसाम सरकारने जानेवारी २०२१मध्ये कायदा मंजूर केला होता. त्यानुसार, राज्यातील सर्व मदरशांना नियमित शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, माध्यमिक शिक्षण मंडळ, आसाम उच्च माध्यमिक शिक्षण आणि राज्य मदरसा शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणारे ७४१ मदरसे आणि अरबी कॉलेजांचा समावेश आहे. यातून खासगी मदरशांना वगळण्यात आले आहे.

हे ही वाचा:

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन होणार

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णय

‘प्रेक्षक पाससाठी घुसखोर सातत्याने सेक्रेटरीच्या संपर्कात’

काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याच वर्षी मार्च महिन्यात कर्नाटकमध्ये एका प्रचारसभेला संबोधित करताना आसाम सरकारने ६०० मदरसे बंद केल्याचा दावा केला होता. राज्यातील सर्व मदरसे बंद केले जातील, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यांना इस्लामी धार्मिक संस्थान नव्हे तर, शाळा, कॉलेज आणि विद्यापीठे हवी आहेत, असेही त्यांनी नमूद केले होते. बांगलादेशातून लोक आसामला येतात आणि आपली सभ्यता आणि संस्कृतीला धोका पोहोचवतात, असा दावा त्यांनी केला होता.

७ डिसेंबर रोजी सरमा यांनी सांगितले होते की, सन २०२०मध्ये आसाम सरकारने सर्व सरकारी आणि प्रांतीय मदरसे बंद करण्याचा आणि त्यांना नियमित शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला होता. त्यामुळे आधी मदरशांमध्ये शिकणाऱ्या तीन हजार ७४८ विद्यार्थ्यांनी सन २०२३मध्ये दहावीची परीक्षा दिली, असे सरमा यांनी सांगितले.

Exit mobile version