जम्मू-काश्मीरमधून पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पहलगाम येथील बैसरन येथे ही गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि बारा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये चार जण राजस्थानचे असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबाची स्थानिक शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेकिंग ट्रिपसाठी गेलेल्या पर्यटकांवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले की हा हल्ला दुपारी अडीच वाजता झाला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भागात फक्त पायी किंवा घोड्यावरून जाता येते. बैसरन खोऱ्यात घोडेस्वारीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर दोन ते तीन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला.