‘माझ्या आईचा फोन आला नसता तर…’

‘माझ्या आईचा फोन आला नसता तर…’

बेंगळुरूमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाने शहर शुक्रवारी हादरले. या स्फोटाचा साक्षीदार असणाऱ्या तरुणाने या स्फोटाचा वहिला व्हिडीओ चित्रित केला आणि स्वतःवर गुदरलेल्या प्रसंग विशद केला.

‘मी नुकतीच माझी ऑर्डर घेतली आणि माझ्या आईचा फोन आला. मी फूड काऊंटरपासून १०-१५ मीटर लांब गेलो. दुसऱ्याच सेकंदात मी मोठा आवाज ऐकला,’ असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या स्फोटात सुमारे १५ जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. अनेक जण होरपळले होते आणि त्यांच्या कानांतून रक्त वाहात होते, असेही त्याने सांगितले.

अलंकृत असे या प्रत्यक्षदर्शीचे नाव आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर असणारा अलंकृत दुपारी साडेबाराच्या सुमारास या कॅफेमध्ये जेवणासाठी गेला होता. तो येथून जवळच असलेल्या एका खोलीत भाडेतत्त्वावर राहतो. ‘मी एक इडली आणि एक डोशाची ऑर्डर दिली. इडली संपल्यानंतर मी डोसा काऊंटरवर गेलो. मी सहसा डोसा पिकअप पॉइंटजवळच बसतो. मात्र जेव्हा मी माझा डोसा उचलला, तेव्हा माझ्या आईचा फोन आला. कॅफेमध्ये खूप आवाज असल्याने मी बाहेरच्या जागी बसायला गेलो. आईशी फोनवर बोलत असतानाच अचानक मागून मोठा आवाज आला,’ असे या अलंकृतने सांगितले.

त्यानंतर येथे अक्षरशः चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती उद्भवली. सगळेजण सैरावैरा पळत होते. ‘इतका मोठा आवाज मी माझ्या आयुष्यात कधीही ऐकला नाही. स्वयंपाकघराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धूर येत होता,’ असेही अलंकृतने सांगितले. अनेक जण जखमी झाले होते. त्यांचे कपडे जळाले होते. काहींच्या कानातून रक्त येत होते. काहींच्या डोक्यातून रक्त वाहात होते. ८० च्या घरातल्या दोन बायका जखमी झाल्या होत्या, त्यांच्या शरीरातून रक्त वाहात होते. लोक त्यांना बँडेज लावत होते, असेही अलंकृतने सांगितले.

हे ही वाचा:

आसाराम बापू तुरुंगातच राहणार

विधानसभेत विरोधकांवर मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार टोलेबाजी

मदतीच्या प्रतीक्षेत जमलेल्या १०४ पॅलिस्टिनींचा चेंगराचेंगरीत मृत्यू

मुंबईत पोलीस निरीक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा

या स्फोटात रामेश्वरम कॅफेचे पाचहून अधिक कर्मचारी जखमी झाले. एकजण रडत होता, असेही तो म्हणाला. त्यानंतर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी आल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आली. आईचा फोन आला म्हणून तो बाहेर पडला नसता तर तोही या स्फोटात जखमी झाला असता, असे अलंकृतने यात सांगितले.

Exit mobile version