सध्या भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत असून यादरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा हाच आगामी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत भारतीय संघाची धुरा कोणाला मिळणार यावरून चर्चा रंगली होती. कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याला देणार की रोहित शर्मा याला यावरून शंका उपस्थित होत होती. अखेर जय शाह यांनी केलेल्या घोषणेमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्याआधी राजकोटमध्ये १४ फेब्रुवारी रोजी सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमच्या नामांतर कार्यक्रमात ही मोठी घोषणा करण्यात आली.
सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नामांतर निरंजन शाह स्टेडियम असे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जय शाह यांनी बोलताना भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२४ वर आपले नाव कोरेल, असा विश्वास व्यक्त केला. “आपण वनडे वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात पराभूत झालो, मात्र आपण सलग 10 सामने जिंकून मनं जिंकली आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की भारत बारबाडोसमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-२० विश्वचषक २०२४ जिंकेल. आपण भारताचा झेंडा फडकवू,” असा विश्वास शाह यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.
हे ही वाचा:
पालघर: मासेमारीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाच्या पायाचा शार्कने घेतला चावा!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबू धाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले!
कॅलिफोर्नियात एक भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळले
टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेचे आयोजन हे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये संयुक्तरित्या करण्यात आले आहे. १ जून ते २९ जून दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारत या स्पर्धेतील आपला पहिला सामना ५ जून रोजी न्यूयॉर्क येथे आयर्लंड विरुद्ध खेळणार आहे.