भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दुसरा सामना भारतीय संघाने सहा विकेट्स राखून दणदणीत जिंकला आहे. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने २६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात ११३ धावांवर गारद झाला आणि भारतासमोर ११५ धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी चार विकेट गमावून हे लक्ष्य गाठले. भारताच्या या विजयात रवींद्र जाडेजाचा मोठा वाटा होता. त्याने दोन्ही डावांत मिळून १० बळी घेतले.
१००वी कसोटी खेळत असलेला चेतेश्वर पुजारा ३१ धावांवर नाबाद राहिला. मर्फीच्या चेंडूवर चौकार मारून चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. कर्णधार रोहित शर्मानेही २० चेंडूंच्या आक्रमक खेळीत ३१ धावा केल्या. विकेटकीपर फलंदाज श्रीकर भारतने २३ धावा केल्या. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या विजयासह भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला आहे.
काय घडलं मॅचमध्ये?
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि नागपूरपेक्षा उत्तम खेळ केला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि सावध पवित्रा फलंदाजी करत २६३ धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांच्या अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियाला चांगली धावसंख्या गाठता आली. भारताकडून शमीने चार आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने अत्यंत खराब सुरुवात केली आणि पहिल्या डावात पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. मात्र अश्विन-अक्षरने शतकी भागीदारी करत भारताला सामन्यात परत आणले. दोघांनी आठव्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. अखेर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या एका धावेची आघाडी मिळाली.
हे ही वाचा :
भूकंपाच्या आघातानंतर आता सीरियावर हवाई हल्ला
भात्यातून बाण निसटले आता ब्लू टिक मोडले
अमित शहांनी लिहिलेले शिवाजी महाराजांवरील पुस्तक येतंय
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप
भारताकडून अक्षरने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर विराट कोहली आणि अश्विननेही उपयुक्त खेळी खेळल्या. ऑस्ट्रेलियाकडून लिऑनने पाच विकेट घेतल्या. मर्फी-कुहमन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही चांगली सुरुवात केली आणि एका टप्प्यावर ६५ धावांवर एक विकेट गमावून चांगली स्थिती असल्याचे दिसत होते. परंतु तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट गमावल्या.
तिसऱ्या दिवसाच्या खेळात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने चेंडूने धुमाकूळ घातला आणि कांगारू संघाचा पाडाव केला. जडेजाने एकूण ७, अश्विनने ३ विकेट घेतल्या आणि कांगारू संघ दुसऱ्या डावात ११३ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताला ११५ धावांचे लक्ष्य मिळाले, ज्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि पुजाराने ३१ धावांची तुफानी खेळी केली. किंग कोहलीने २० धावा केल्या. जाडेजाने १२.१ षटकांत ४२ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ७ फलंदाजांना माघारी धाडले. पहिल्या डावात त्याने ३ बळी घेतले होते. अशाप्रकारे भारताने दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स राखून शानदार विजय मिळवला. यासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पुढचा सामना जिंकताच भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल.