भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोच्या चांद्रयान- ३ मोहिमेतील ऐतिहासिक यशानंतर इस्रो आता पुढील चंद्र मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. इस्रो सध्या चांद्रयान-४ नावाच्या आगामी चंद्र मोहिमेची तयारी करत आहे. या मोहिमेमध्ये केवळ चंद्रावर पोहोचणे हे उद्दिष्ट नसून चंद्रावरून खडक आणि माती पृथ्वीवर परत आणणे हे उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये असणार आहे.
इस्रोचे चांद्रयान- ४ ही मोहीम आधीच्या मोहिमांप्रमाणे एकाच टप्प्यात प्रक्षेपित केले जाणार नाही, तर दोन स्वतंत्र प्रक्षेपण या मोहिमेत केली जाणार आहेत. हे यान केवळ चंद्रावर उतरणार नाहीत तर चंद्राच्या पृष्ठभागावरून खडक आणि माती भारतात परत आणतील. चांद्रयान-३ मध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल या तीन मुख्य घटकांचा समावेश होता. आता चांद्रयान-४ मध्ये या घटकांसह चंद्रावरील नमुने परत पृथ्वीवर आणण्यासाठी आणखी दोन अतिरिक्त घटक असणार आहेत.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी नॅशनल स्पेस सायन्स सिम्पोजियममध्ये सादर केलेल्या सादरीकरणानुसार चांद्रयान-४ मोहिमेमध्ये पाच अंतराळ यान मॉड्यूल असणार आहेत.
हे ही वाचा :
‘त्या मालिकेने दिली आयुष्याला कलाटणी’
ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?
शेख शाहजहान याला सीबीआयकडे सोपवण्यास प. बंगालचा नकार
भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सुरू!
चांद्रयान-४ मोहिमेतील पाच घटक एकत्र सोडले जाणार नाहीत. इस्रोच्या प्रमुखांच्या मते, भारतातील सर्वात वजनदार लॉन्च व्हेइकल एलव्हीएम तीन घटकांसह प्रक्षेपित होणार आहे. ज्यामध्ये प्रोपल्शन मॉड्यूल, डिसेंडर मॉड्यूल आणि असेंडर मॉड्यूल असणार आहेत. ट्रान्सफर मॉड्यूल आणि री-एंट्री मॉड्यूल पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलवरून (PSLV) प्रक्षेपित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे एक मोहीम पूर्ण करण्याच्या उद्देशाने दोन प्रक्षेपण वाहनांचा समावेश असलेली ही पहिलीच मोहीम असणार आहे. चांद्रयान-४ चा उद्देश हाच असणार आहे की, नुकतीच चांद्रयान- ३ ही ऐतिहासिक मोहीम यशस्वी झाली होती. या मोहिमेच्या आधारे अधिक जटिल उद्दिष्टे शोधण्याचा प्रयत्न या चांद्रयान- ४ मोहिमेमधून करण्यात येणार आहेत. चांद्रयान-४ च्या यशस्वी मोहिमेनंतर चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने परत आणणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.
चांद्रयान- ४ मोहिमेतील पाच मॉड्यूल
- प्रोपल्शन मॉड्यूल- चांद्रयान-३ या मोहिमेप्रमाणेच प्रोपल्शन मॉड्यूल हे चांद्रयान-४ ला चंद्राच्या कक्षेत वेगळे होण्यापूर्वी मार्गदर्शन करेल.
- डिसेंडर मॉड्यूल- चांद्रयान- ३ मधील विक्रम लँडरप्रमाणे हे मॉड्यूल लँडिंगसाठी मदत करणार आहे.
- असेन्डर मॉड्यूल- चंद्रावर माती आणि खडकांचे नमुने गोळा आणि संग्रहित केल्यावर असेन्डर मॉड्यूल लँडरमधून बाहेर पडेल आणि पृथ्वीवर परत येईल.
- ट्रान्सफर मॉड्युल- असेंडर मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी या मॉड्युलची मदत होणार आहे.
- री-एंट्री मॉड्युल- चंद्रावरून परतीच्या प्रवासानंतर पृथ्वीवर येणारे चंद्रावरील माती आणि खडकांचे नमुने घेऊन जाणारे हे कॅप्सूल असणार आहे.