भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान केले. मात्र हा पुरस्कार प्रदान करताना बाजूला राष्ट्रपती उभ्या होत्या तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते. यावरून शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसचे जवाहर सरकार आणि अन्य काहींनी टीका केली होती. मात्र हे प्रोटोकॉनुसारच होते, असे आता समोर आले आहे.
राष्ट्रपती भवनात पुरस्कार सोहळा असताना केवळ राष्ट्रपती आणि पुरस्कार्थीच उभे असतात. तर, हॉलमधील सर्व उपस्थित आसनस्थ असतात. या सोहळ्याची अनेक छायाचित्रे आणि व्हिडीओंमधून हे स्पष्टच दिसते. जर कोणी पुरस्कार्थी वृद्धापकाळामुळे, आरोग्याच्या समस्येमुळे उभा राहू शकत नसेल तर तो व्हीलचेअरवर बसून हा पुरस्कार स्वीकारतो आणि राष्ट्रपती उभे राहून अशा व्यक्तींना पुरस्कार देतात.
लालकृष्ण अडवाणी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे राष्ट्रपती भवनात जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना घरीच भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यांना पुरस्कार देताना ते खुर्चीवर बसले होते. मोदी हे केवळ हा पुरस्कार देताना तिथे उपस्थित होते. त्यामुळे ते सोहळ्यातील अन्य उपस्थितांप्रमाणेच खुर्चीवर बसले होते.
हे ही वाचा:
हिंदू रिक्षा चालकावर जमावाचा हल्ला
अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी
‘मॉस्को हल्ल्याशी संबंध असल्याचा रशियाचा आरोप धादांत खोटा’
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन २०१७ ते २०१९ या कार्यकाळात प्रेस सचिव असलेले अशोक मलिक यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे पुरस्कार्थी व राष्ट्रपतींनी उभे असणे गरजेचे आहे. या सोहळ्याला केवळ उपस्थित असणाऱ्याने उभे राहण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यातून राजकीय वाद उकरून काढण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती भवनात जेव्हा सोहळा होतो, तेव्हाही केवळ राष्ट्रपती आणि पुरस्कार्थी उभे असतात, सोहळ्यातील अन्य उपस्थित तेव्हा बसलेले असतात. त्यांना उभे राहण्याची गरज नसते, असे त्यांनी सांगितले.