२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार उखडून टाकण्याचा प्रयत्न झाला. यात अमेरीकी डीप स्टेटचा सहभाग होता. हा विषय सध्या तुफान चर्चेत आहे. कारण अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच हा गौप्यस्फोट केलेला आहे. भारतात सरकार उलथवण्याचे प्रयोग यापूर्वीही झालेले आहेत. ‘लोकसभेचा विरोधी पक्षनेता असताना १९९९ साली मी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पाडले’, हा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नव्याने केलेला आहे. दिल्लीत ‘संसद भवन ते सेण्ट्रल विस्टा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवार यांनी हा दावा केलेला आहे. सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न निर्माण होतो, २५ वर्षांपूर्वी पवार केंद्रातील सरकार उलथवण्याचे निमित्त बनले, परंतु त्याचा सूत्रधार नेमका कोण होता?