महाविकास आघाडीच्या सत्ताकाळातच शिवसेनेच्या विभाजनाची सुरूवात झाली. ती प्रक्रीया अजून थांबताना दिसत नाही. ही गळती थांबवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काय केले? पक्ष सोडून बाहेर पडलेल्या नेत्यांवर ठपका ठेवला. त्यांच्यावर टीकेचे शेणगोळे फेकले. त्यांच्याविरोधात गद्दार, घाण, मुडदे, खोके, मिंधे, अशा नव नव्या शेलक्या शब्दप्रयोगांचा वापर केला. बदनामीची ही मोहीम अखंडपणे राबवण्यात आली. इतका आटापिटा करून गळतीची प्रक्रीया थांबताना दिसत नाही. नवे नवे ‘गद्दार’ बाहेर पडतातच आहेत. शिवसेनेत ‘गद्दार’ आहेत तरी किती ? की उद्धव ठाकरे ‘गद्दारांचे’च पक्षप्रमुख आहेत? असा सवाल लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. ठाकरेंच्या लक्षातच येत नाही की, इथे दोष गळणाऱ्या पाण्याचा नाही, फुटलेल्या मडक्याचा आहे.