संसद ते विधी मंडळ सर्वत्र फेक नरेटीव्हचा सुळसुळाट आहे. विरोधकांच्या नरेटीव्ह अस्त्रावर सत्ताधारी सतत बोलतायत. परंतु प्रत्यक्षात या अफवा पसरवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशाच एका फेक नरेटीव्ह प्रकरणी उबाठा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेत खडसावले, खोटी माहीती पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असा दम दिला. कारवाईची घोषणा केली खरी, प्रत्यक्षात कारवाई कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. कारण यापूर्वी अशा अनेक घोषणा झाल्या, परंतु पुढे प्रत्यक्षात काहीही होत नाही, असा अनुभव आहे. महायुतीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी अनेक प्रकरणात एसआयटीची घोषणा केली, काही प्रकरणे सीबीआयकडे सोपवली होती. ही सगळी प्रकरण भिजत पडलेली आहेत. त्यामुळे ना फेक नरेटीव्ह प्रकरणी कारवाई होत, ना सत्ताधाऱ्यांनी लावून धरलेल्या प्रकरणातून काही निष्पन्न होत नाही, त्यामुळे अफवा पसरवणारे, घपले करणारे निर्ढावलेले आहे.