मविआचे सरकार गेल्या पासून तोल ढळलेल्या उबाठा शिवसेनेच्या नेत्यांची अस्वस्थता काही कमी होताना दिसत नाही. उद्धव ठाकरेंना आपले मुख्यमंत्री पद गेल्याची सल जात नाही, आदित्यना मंत्रीपद आणि इतर नेत्यांना सत्ता गेल्याची सल जात नाही. पक्ष फुटल्यापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पाणउतारा करण्याचा कार्यक्रम आजही जारी आहे. शिवसैनिकांची साथ सुटल्यामुळे कामरा सारख्या भाडोत्र्यांच्या जीवावर राजकारण रेटण्याची वेळ ठाकरेंवर आलेली आहे. हनुमानाची फजिती करण्यासाठी त्याच्या शेपटाला आग लावण्याचा परीणाम काय झाला सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणून ज्यांना लंकेची काळजी आहे, त्यांनी हनुमानाच्या शेपटाला आग लावू नये. हा धडा काही जणांना त्यांची लंका जळेपर्यंत लक्षात येत नाही.