देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षाचा जाेश सर्वत्र पहायला मिळताेय.काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत निर्माण झालेले हे स्वातंत्र्याचे वातावरण फुटीरतावाद्यांच्या नजरेत खुपते आ हे. स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी सॅन फ्रान्सिस्काेमधील भारतीय वाणिज्य दुतावासाच्या भिंतीवर खलिस्तानच्या घाेषणा लिहिल्याचे दिसून आल्याचे पाकिस्तानच्या जिओ न्यूजने म्हटले आहे. खलिस्तानचे नेता गुरपतवंत सिंह पन्नू यांनी प्रमुख ठिकाणी खलिस्तानचा झेंडा फडकवण्यासाठी राेख बक्षीस देण्याची घाेषणा केली. शिराेमणी अकाली दलाचे अमृतसरमधील प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांनीही ‘हर घर तिरंगा’ माेहीमेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केलं. अशा प्रकारच्या फुटीरतावादी कारवाया करून अराजक निर्माण करायचे आणि आपली चळवळ अजुनही जिवंत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न पंजाबमधील लाेकांनीच हाणून पाडला. गुरपतवंत सिंह पन्नू यांच्या निवासस्थानीच पंजाबमधील लाेकांनी तिरंगा फडकावला. फुटीरतावादी कारवायांना आम्ही आता बधणार नाही हेच पंजाबमधील या लाेकांच्या एकजुटीने दाखवून दिलं.