बंगालमध्ये फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षाची स्थापना केली आहे. सिद्दीकी यांनी असदुद्दीन ओवैसींच्या एमआयएमशी युती करण्याचेही जाहीर केले आहे. एमआयएम आणि इंडियन सेक्युलर फ्रंट(आयएसएफ) मिळून १०० जागा लढवणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये जवळपास ४०% मुस्लिम लोकसंख्या आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला ४३% मतं होती तर भारतीय जनता पक्षाला ४०% मतं होती. दोन पक्षांमध्ये फक्त ३% मतांचा फरक होता. निवडणुकीच्या विश्लेषातून मिळालेल्या माहितीनुसार ममतांना ७५% मुस्लिम मतं मिळाली होती. २०२० बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने केवळ ५ जागा जिंकल्या होत्या पण जवळपास २०-२५ जागांवर त्यांनी मतं घेऊन काँग्रेस आणि राजद युतीला धक्का दिला होता आणि केवळ १० जागा जास्त घेऊन आज बिहारमध्ये भाजपा आणि जदयू सरकारमध्ये आहे.
पश्चिम बंगालमध्ये १२५ विधानसभेच्या जागा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदार हे मोठ्या संख्येने आहेत. या जागांवर मुस्लिम मतांचा मोठा प्रभाव आहे. बिहारप्रमाणे जर बंगालमध्येही एमआयएमने मुस्लिम मते मिळवण्यात यश मिळवले, तर ममतांना निवडणूक जिंकणे कठीण होईल.