पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप काल सोमवारी जाहीर झाले. मोदी-३ हे पहील्या दोन सरकारच्या तुलनेत वेगळे आहे. दोन वेळा भाजपाला पूर्ण बहुमत होते. आज ते मोदींकडे नाही. त्यामुळे आघाडीचे सरकार बनवताना मोदींना तडजोडी कराव्या लागणार, पूर्वीच्या तुलनेत सरकार आक्रमक निर्णय घेऊ शकणार नाही, असे अनेकांना वाटत होते. परंतु खातेवाटपात सगळी महत्वाची खाती भाजपाच्या नेत्यांना बहाल केल्यामुळे मोदींवर मित्र पक्षांचा दबाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अल्पसंख्यकांच्या बाबतीतही सरकारची भूमिका खातेवाटपातून स्पष्ट झालेली आहे. सरकार डळमळीत नसून खमके आहे, याची झलक या विस्तारातून मिळालेली आहे.