या हिवाळ्यात १० नेपाळी शेर्पांच्या समुहाने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. या शिखरावर हिवाळ्यात यशस्वी चढाई करणारे ते पहिलेच ठरले आहेत.
के२ हे पाकव्याप्त काश्मीरच्या चीनला लागून असलेल्या भागातील शिखर आहे. जगात ८,००० मीटरपेक्षा (२८,२५१ फूट) अधिक उंचीची १४ शिखरे आहेत आणि के२ हे त्यापैकी एक शिखर आहे. के२ ची उंची ८,६११ मीटर आहे. माऊंट एव्हरेस्ट (८,८४८ मीटर) नंतर जगातील सर्वात उंच शिखर म्हणून के२ ची नोंद होते. के२ हे काराकोरम पर्वत रांगेत येते.
१० नेपाळी शेर्पांच्या चमूने हे शिखर पादाक्रांत केले आहे. या चमूत मिंग्मा ग्यालजे शेर्पा, निर्माल पुर्जा, पुन मगर, गेलजे शेर्पा, मिंग्मा डेव्हिड शेर्पा, मिंग्मा तेन्झी शेर्पा, दावा टेम्बा शेर्पा, पेम छिरी शेर्पा, किलू पेम्बा शेर्पा, दावा तेन्जिन्ग शेर्पा आणि सोना शेर्पा यांचा समावेश होता.
“नेपाळी गिर्यारोहकांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. हिवाळ्यातील चढाईच्या इतिहासात प्रथमच नेपाळी शेर्पा के२ शिखरावर (जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर) पोहोचले आहेत. नेपाळी गिर्यारोहकांचे अभिनंदन” मिरा आचार्य या नेपाळ पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहीले आहे.
के२ वरील चढाई अवघड आहे. विशेषतः हिवाळ्यात या शिखरावरील चढाई वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीमुळे या काळातील चढाई अधिक आव्हानात्मक असते. यापुर्वी देखील काही गिर्यारोहकांनी के२ वर हिवाळ्यात चढाई करण्याचे प्रयत्न केले होते. दुर्दैवाने ते अयशस्वी ठरले होते. यापुर्वी २००८ मध्ये झालेल्या हिमस्स्खलनात अकरा गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यु ओढावला होता. या शिखरावर १९८७-१९८८ पासून हिवाळ्यातील चढाईच्या मोजक्याच मोहिमांचे आयोजन झाले होते. आजवर कोणीही हिवाळ्यात चढाई करताना ७,६५० मीटरच्या वर जाऊ शकले नव्हते. नेपाळी शेर्पांच्या हिंमतीमुळे गिर्यारोहणात एक नवा विक्रम नोंदला गेला आहे.