नेपाळमधील एका जल विद्युत प्रकल्पाचे काम सतलज जल विद्युत निगम या कंपनीला देण्यात आले. या पूर्वी हे काम चीनी सरकारच्या मालकीच्या पॉवर चायना या कंपनीला मिळणार होते. मात्र एका परिषदेत हा प्रकल्प मांडला गेल्यानंतर चीनने यातून माघार घेतली. भारताला या प्रकल्पात रस होताच. त्यानंतर विविध प्रशासकिय प्रक्रिया झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने आंतरराष्ट्रीय निविदांमधून या कंपनीची निवड केली आणि आता हे काम या भारतीय कंपनीला देण्यात आले आहे.
नेपाळ हा भारताच्या उत्तरेला वसलेला देश. भारताच्या गंगा खोऱ्यातील फक्त १४ टक्के भूभाग नेपाळच्या हद्दीत येतो परंतू एकूण गंगा नदीप्रणालीमध्ये नेपाळमधून ३८ टक्के इतकं पाणी येतं. नेपाळमधील सर्व नद्या भारतात वाहून येतात आणि बांग्लादेशमार्गे बंगालच्या उपसागरात जाऊन आपला प्रवास संपवतात. नेपाळ आणि भारत यांच्यातील जल संबंध कायमच अढी असलेले राहिले आहेत. १९५१ पासून विविध करार करूनही, दोन्ही देशांना पाणी प्रश्नावर समान उभयपक्षी मान्य होणारा तोडगा काढणे जमलेले नाही. त्यात झालेल्या चीनच्या प्रवेशामुळे एकूणच दोन्ही देशातील संबंधांना नवा आयाम प्राप्त झाला आहे. हेच या व्हिडियोत थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.