कोविड-१९ ह्या आजारामुळे दक्षिण अर्थात लॅटिन अमेरिकेने सामाजिक आणि राजकीय अस्थिरता अनुभवली. आर्थिक शाश्वती नसल्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या अनेक देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना २०२१ मध्ये चिली, इक्वीडोर आणि पेरू ह्या देशांमध्ये निवडणुकांची घाई बघायला मिळत आहे. अनेक नवीन चेहरे ह्या निवडणुकांमधून लोकांसमोर येत आहेत. चिलीत राष्ट्राध्यक्ष सॅबेस्टियन पिनेरा ह्यांना होत असलेला प्रचंड विरोध ह्यामुळे ह्यावर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये दोन नवीन चेहरे राजकीय पटलावर येतील अशी चिन्ह आहेत. नवीन चेहऱ्यांसोबतच डावे विरुद्ध उजवे असाही संघर्ष चिलीत ह्यावर्षी आपल्याला पाहिला मिळेल. पेरूत २०१७ पासून चालेल्या राजकीय गोंधळामुळे ह्यावर्षी होणाऱ्या निवडणुका ह्या निर्णायक असतील. पेरुव्हियन सरकारची दिशा ह्या निवडणूका स्पष्ट करतील. तर इक्वीडोर ह्या देशातही सत्तापालट होऊन एक तरुण अर्थशास्त्री देशाच्या सर्वोच पदावर जाऊन बसेल अशी चिन्ह दिसत आहेत. इक्वीडोर मधील हा सामाना येत्या फेब्रुवारीतच रंगणार आहे. ह्या तिन्ही देशांमध्ये वर्षानुवर्षे डाव्या विचारसरणीकडे झुकरणारे मतप्रवाह प्रसिद्ध होते. परंतु इथे राष्ट्रीय स्तरावर सत्ता एकवटू शकेल असा कोणताच पक्ष सध्या नाही. निदर्शनं आणि आंदोलनांना सामाजिक प्रतिसाद मिळत असला तरी त्यातून एका ध्येयाने झपाटलेले नेते पुढे येतील असे नाही. देशाला स्थिर सत्ता देण्यासाठी लागणारा राजकीय सुसंवाद, देशभरात केली जाणारी पक्ष बांधणी किंवा सुप्रसिद्ध आणि विश्वासू नेत्यांचा अभाव ह्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. सामाजिक चळवळीतून एखादा नेता निवडून जरी आला तरीही एक संघटना नसल्याने जनतेच्या मागण्यांना मूर्त स्वरूप देणे कठीण होते आहे.