ब्रिस्बेनमध्येही “भारत माता की जय”

Historic Victory at Brisbane

ऐतिहासिक मालिकेत भारत विजयी. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये धूळ चारली. बॉर्डर-गावस्कर चषक भारताने पुन्हा एकदा पटकावले. भारतने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. अवघ्या ३६ धावांवर भारताचे सर्व गडी बाद झाले होते. आणि दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था होऊन पहिल्या कसोटीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हा देखील मालिका सोडून भारतात परतला होता. सगळ्या दिग्गजांनी भारताचा दारूण पराभव होणार असे भाकित केले होते. रिकी पॉन्टिंग, मायकल वॉन, मायकल क्लार्क, मार्क वॉ अशा अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताचा ४-० पराभव होणार अशी  भविष्यवाणी केली होती.

दुसऱ्या कसोटीत कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले. त्या कसोटीत कोणीही भारताकडून जिंकण्याची अपेक्षासुद्धा केली नव्हती. अशा परिस्थितीत अजिंक्य रहाणेने शतक मारून भारताचा डाव सावरला. त्या शतकी खेळीने भारताच्या जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या. आणि अत्यंत अनपेक्षितपणे भारताने तो कसोटी सामना जिंकला. आणि भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने कडवी झुंज दिली. हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन यांनी अक्षरशः बाजीप्रभूसारखी खिंड लढवली. ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. भारताने तो सामना अनिर्णित करण्यात यश मिळवले. हा पराक्रम विजयाएवढाच मोठा होता.

चौथा सामना जेंव्हा सुरु झाला तेंव्हा भारताचे अश्विन, विहारी, जाडेजा, बुमराह हे खेळाडू देखील जखमी झाले होते. त्यामुळे भारताची गोलंदाजी अत्यंत नवखी होती. भारताच्या सर्व गोलंदाजांचे मिळून कसोटीतले बळी हे केवळ ११ होते तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे १०१३ बळी होते. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत भारताने शेवटच्या दिवशी धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. ब्रिस्बेनमध्ये ३२ वर्षात कोणीही ऑस्ट्रेलियाला कसोटी सामन्यात हरवले नव्हते. पण १९ जानेवारी २०२१ ला भारताने हा विक्रमही केला. भारतीय क्रिकेट रसिकांनी मैदानात “भारत माता की जय” अशा घोषणाही दिल्या.

भारताचे अनेक खेळाडू जखमी असतानासुद्धा भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये हरवले. या सर्व कारणांमुळे हा एक ऐतिहासिक विजय आहे.

Exit mobile version