मुंबईत मराठीच्या नावावर दुकान चालवणारे बरेच नेते आहेत, पक्ष आहेत. मराठीचे इतके ठेकेदार असूनही मराठी माणसाचे हाल काही कमी होताना दिसत नाहीत. मुंबईतून त्यांचे स्थलांतर काही कमी होत नाही. दक्षिण मुंबईत उपकर प्राप्त इमारती रिकाम्या करून तिथून मराठी माणसाची हकालपट्टी सुरू आहे. यात सामील असलेले लोक वजनदार पाकीटांचे नियमित वाटप करत असल्यामुळे इथे कोणीही ओरड करत नाही. चार मजल्यांच्या उपकर प्राप्त इमारती पाडून तिथे १२ मजल्यांच्या अनधिकृत इमारती ठोकल्या जातात. कोर्टबाजी करून प्रकरण वर्षोनुवर्षे लोंबकळवले जाते. आधी मजल्यावर मजले आणि नंतर तारीख पे तारीख. विश्वास बसत नसेल तर शीतावरून भाताची परीक्षा करू. इमारतीचे नाव लक्ष्मी निवास, मुक्काम पोस्ट डोंगरी.