लोकसभेच्या निकालानंतर पक्षात आलेली मरगळ, नैराश्य झटकून नव्या चैतन्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणे या उद्देशाने पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारीणीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर विधानसभा निवडणुकीत फडणवीस विरुद्ध शरद पवार असा सामना होणार हे अगदी निश्चित आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी थेट पवारांना आव्हान दिलेले आहे. या दोघांतला जो नेता डावपेचात सरस ठरेल, सत्तेचा लंबक त्याच्याच बाजूने झुकणार आहे.