राजकारणातील मुंगळे कायम सत्तेच्या गुळाला चिकटण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात हे चित्र वारंवार पाहायला मिळाले आहे. मविआच्या सत्ता काळात देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याची जोरदार तयारी सुरू होती. परंतु बहुधा इंधन कमी पडल्यामुळे हा कट शिजलाच नाही. आज तेच नेते फडणवीसांच्या आरत्या ओवाळतायत. फडणवीसांची तारीफ करणाऱ्यांच्या यादीत आता सुप्रिया सुळे यांचे नावही सामील झाले आहे. सुप्रिया सुळे या काही फडणवीसांच्या समर्थक नाहीत. त्यांच्या कडव्या विरोधकांमध्ये सुळे यांचे नाव घेतले जाते. त्या जर फडणवीसांची प्रशंसा करत असतील तर समजा मामला गडबड है. लोकांच्या मनात गोंधळ माजलाय. हे बोल त्यांचेच आहेत की सुळेबाई दुसऱ्याची स्क्रिप्ट वाचतायत हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.