२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी प्रचाराचा धुरळा उडवून देताना नरेंद्र मोदी यांनी देशातील काळापैसा खणून काढण्याची घोषणा केली होती. भाजपाच्या जाहीरनाम्यातही काळ्या पैशाचा निकाल लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने PMLA कायद्याची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. अनेक बडे राजकारणी या कायद्याच्या कचाट्यात सापडले. काही गजाआड झाले. हा कायदा म्हणजे केंद्रात सत्तेवर बसलेल्या सिंहाचे धारधार सुळे आणि नखं आहेत याची जाणीव विरोधकांना झाली. कायद्याचा वापर करून PMLA कायद्याचा काटा काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु या कायद्याची धार बोथट करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने जबरदस्त दणका दिला आहे. या दणक्याचे हादरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही बसले आहेत.