दादांचा सोंगाड्या पन्नाशीचा झाला

दादांचा सोंगाड्या पन्नाशीचा झाला

“सोंगाड्या” रिलीजला खणखणीत पन्नास वर्षे

मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी

काय ग सखू बोला दाजिबा… राया मला पावसात नेऊ नका ..

अशा लोकप्रिय गाण्यांमुळे आजही चर्चेत असलेल्या दादा कोंडके निर्मित आणि अभिनित “सोंगाड्या” ( रिलीज १२ मार्च १९७१) च्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक ट्रेण्ड सेटर चित्रपट आहे. महत्वाचे म्हणजे, सोंगाड्याच्या प्रदर्शनाची ही तारीख दादांच्या चित्रपटांची वितरण व्यवस्था सांभाळणारे विजय कोंडके यांजकडून कन्फर्म केली आहे. या चित्रपटापासूनच दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी जमली आणि मग हिट चित्रपटांची रांगच लागली. दादा कोंडके यांचा आपला हुकमी असा ऑडियन्स तयार झाला आणि तो मग दादांच्या प्रत्येक चित्रपटाची वाट पाहू लागला. त्याची सुरुवात या “सोंगाड्या” ने झाली. हा चित्रपट २४ फेब्रुवारी १९७१ रोजी विनाकट सेन्सॉर संमत झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे आहे. कथा पटकथा संवाद वसंत सबनीस यांचे आहेत तर गीते वसंत सबनीस, जगदीश खेबुडकर आणि दादा कोंडके यांची असून संगीत राम कदम यांचे आहे. त्या काळात गावोगावी लाऊडस्पीकरवर सोंगाड्याची गाणी तुफान गाजली. हा चित्रपट सर्वप्रथम पुणे शहरात भानुविलास थिएटरमध्ये रिलीज झाला आणि पहिल्याच शोपासून सुपर हिट ठरला. तेव्हा पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरात एकूण पाच प्रिन्टने हा चित्रपट रिलीज झाला. तेथे ३२ आठवडे मुक्काम केल्यावर हा चित्रपट रतन थिएटरमध्ये शिफ्ट करण्यात आला आणि तेथे या चित्रपटाने साठ आठवडे मुक्काम केला. मुंबईत सोंगाड्या एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला आणि दादरच्या कोहिनूर थिएटरमध्ये ( आताचे नक्षत्र ) हाऊसफुल्ल गर्दीत सुरु असतानाच तेथे नवकेतन फिल्मचा विजय आनंद दिग्दर्शित ‘तेरे मेरे सपने ‘ १३ मे रोजी प्रदर्शित करण्याची तयारी सुरु असताना दादा कोंडके यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना ही गोष्ट सांगताच शिवसेनेने आंदोलन करीत ‘तेरे मेरे सपने ‘चे प्रदर्शन रोखले आणि मग “सोंगाड्या”ने तेथे सुवर्ण महोत्सवी यश संपादले. या आंदोलनाची बातमी तेव्हा सर्व मराठी वृत्तपत्रात तसेच मार्मिक साप्ताहिकात ठळकपणे प्रसिद्ध झाली. सोंगाड्या हे सत्तरच्या दशकातील चित्रपट रसिकांचे जणू वेडच होते. या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने हा “टाॅप फोकस.”

Exit mobile version